ठाणे : मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आणि त्यांनी स्वत: सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत एकही अनधिकृत इमारती होऊ द्यायची नाही. परंतु शिंदे यांच्या आशीर्वादाने बांधकाम होत असल्याचे सांगून त्यांचेच चमचे त्यांचे नाव बदनाम करीत आहेत. खरेतर शिंदे यांचे कोणत्याच बांधकामांना आशीर्वाद नसून त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे की, बेकायदा बांधकाम होऊ देऊ नका, असा दावा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी समाजमाध्यांवरून केला.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे गेल्या काही दिवसांपासून मुंब्य्रातील बेकायदा बांधकामांविरोधात आक्रमक भुमिका घेताना दिसून येत आहेत. काही दिवस आधी त्यांनी मुंब्य्रातील रस्त्यावर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी जाऊन त्याचे थेट प्रेक्षपण करत पालिकेवर टिका केली होती. या टिकेनंतर पालिका प्रशासनाने ही इमारतच जमीनदोस्त केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी शुक्रवारी मुंब्रा परिसरातील टपाल विभागाच्या आरक्षित भुखंडावर सुरू असलेल्या बेकायदा इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाहाणी केली आणि या बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून समाजमाध्यमांद्वारे प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला.
मुंब्य्रातील टपाल विभागाच्या आरक्षित भुखंडाचे आरक्षण बदलून ही जागा शाळेसाठी किंवा समाजपयोगी कामांसाठी आरक्षित करता येऊ शकते. परंतु बेकायदा इमारती उभारणारे बिल्डर आणि त्यांच्या दलालांनी येथे अनधिकृत इमारती उभारण्यास सुरूवात केली आहे. आरक्षित भुखंडावर बेकायदा इमारती उभ्या राहू देऊ नका, असे अनेकदा पालिका आयुक्तांना सांगितले आहे. अशा इमारतींमुळे शहराचे नुकसान होते. येथे शाळा, महाविद्यालये आणि दवाखाने यासाठी आरक्षित असलेल्या भुखंडावर इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारती कोण बांधत आहेत, हे पालिकेच्या अधिकाऱ्याने आयुक्तांना सांगायला हवे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आणि त्यांनी स्वत: सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत एकही अनधिकृत इमारती होऊ द्यायची नाही. परंतु शिंदे यांच्या आर्शीवादाने बांधकाम होत असल्याचे सांगून त्यांचेच चमचे त्यांचे नाव बदनाम करीत आहेत. खरेतर शिंदे यांचे कोणत्याच बांधकामांना आर्शीवाद नसून त्यांनी कोणालाही बांधकाम करायला सांगितलेले नाही. तसेच त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे की, बेकायदा बांधकाम होऊ देऊ नका. त्यामुळे या बांधकामांबाबत मी जाऊन त्यांना सांगणार आहे आणि बांधकामांचे चित्रीकरणही पाठविणार आहे, असे आव्हाड म्हणाले.