राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा उल्लेख आहे. क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ही क्लिप ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर या अधिकाऱ्याची असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी महेश आहेर यांना मारहाण केली आहे.
त्यातच जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये महेश आहेर यांच्या केबिनमधील एक व्यक्ती पैसे मोजताना दिसत आहे. ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी लिहलं की, “महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सर्व जमाखर्च संभाळणारे म्हाडसे या व्हिडीओत पैसे मोजताना दिसत आहेत.”
काय आहे प्रकरण?
जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केला आहे, अशा संभाषणाची एक क्लिप व्हायरल झाली. या क्लिपमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
महेश आहेर यांना मारहाण
ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर महेश आहेर हे सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षारक्षकही होते. पण, पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला मारण्याची धमकी देतो का? असे बोलत कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.