ठाणे: ठाण्यातील पाचपाखाडी भागात प्रतितुळजापूर मंदीर उभारण्यात आले आहे. या मंदिराचा सोहळा सुरू झाला असून आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पुजेसाठी भगवी वस्त्र परिधान केली होती. आव्हाड यांची भगवी वस्त्र सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

ठाण्यातील पाचपाखाडी भागात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून प्रति तुळजापूर मंदीर उभारण्यात आले आहे. हे मंदिर काळ्या पाषाणात उभारण्यात येत आहे. यासाठी तमीळनाडूचे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंड एडकाॅमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली.

शिखर कलश, नवग्रह, दगडी स्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती या कृष्णशिळेतून साकारुन ठाण्यात आणण्यात आले. काही शिळांना ठाण्यातच आकार दिला गेला. प्रत्यक्ष मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला. या मंदीरावर मंगळवार, २९ एप्रिल रोजी कळसाची स्थापना करण्यात येणार आहे. तर येत्या ३० एप्रिलला मंदीरातील तुळजाभवानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते होणार आहे.

दरम्यान, या मंदिरात विविध सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी मंदिर ‘मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा आरंभ’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आव्हाड यांच्या हस्ते मंदिरात देवी-देवतांची विधिवत पुजा झाली. त्यावेळी आव्हाड यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती. आव्हाड यांची ही वस्त्रे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.चौकट

– सुमारे दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करुन ३३ फुटांचा कलश आणि त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, २६ खांब, २० गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज असे हे मंदिर आता साकारले आहे. २६ खांब हे अंखड आहेत. मंदिरात प्रवेशद्वार, महामंडप आणि मदिराचे गर्भगृह अशी तीन टप्प्यात मंदीराची रचना करण्यात आलेली आहे. वैदीक शास्त्रामध्ये नवग्रहाला महत्व असून हे नवग्रही मंदिरात स्थापित करण्यात आले आहे. ३० एप्रिलला रात्री ८ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री १० वाजता अहोरात्र गोंधळ जागरणही केले जाणार आहे. हे मंदीर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.