राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका ट्वीटची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या ट्वीटवरून ठाण्यात शिंदे गट विरुद्ध आव्हाड असा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खारेगाव उड्डण पूलावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एक एलईडी बोर्ड महापालिकेने कारवाई करून काढला आहे. तर हा बोर्ड शिंदे गटाच्या दबावामुळे काढण्यात आला असल्याचा आरोप आव्हाडांकडून करण्यात आला आहे.

याशिवाय, “किती हे सुडाचे राजकारण…कळव्याच्या पूर्वेली मी जी आमदार निधीतून कामे केली आहेत. त्या कामाचा उल्लेख असलेला LED बोर्ड आमदार निधीतून लावण्यात आला होता. आज सकाळी अचानक ८ वाजता महापालिकेचे अधिकारी मनिष जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्या बोर्डची मोडतोड करून तो काढण्यात आला.” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा मतदार संघाचे आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याला लागूनच त्यांचा मतदारसंघ असल्याने शिंदे गट विरुद्ध आव्हाड असा संघर्ष मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पेजवर याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अरविंद मोरे यांची एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, “काल संध्याकाळी गद्दार सेनेचे खासदार आणि शकुनीमामाच्या दौऱ्यानंतर आज सकाळी ७ वाजता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कामांचा उल्लेख असलेले कळवा पूर्वेमध्ये लावलेले एलईडी बोर्ड काढण्यात आले. हे बोर्ड काढण्याची वेळ होती सकाळी ७ वाजताची. महानगरपालिकेचे सर्वच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते व पोलीस अधिकारी देखिल उपस्थित होते. मी स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत फोन केले; त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची उत्तरे नव्हती. संपूर्ण ठाण्यामध्ये अनेक राजकीय लोकप्रतिनिधिंचे एलईडी लागलेले आहेत. ते काढा असे मी मुळीच सांगत नाही. पण लागलेले आहेत हे निदर्शनास आणून देतो. मग जितेंद्र आव्हाड यांच्यावरच एवढा राग का?”

याशिवाय, “एक लक्षात ठेवा की, तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या नावाने बोललात कि त्यांचा अंत जवळ आला आहे, त्यांचा शेवट जवळ आला आहे. ही वाक्य घृणास्पद तर आहेतच पण अत्यंत वेदनादायी देखील आहेत. कळव्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधकांनाही त्यांच्या विरोधात काढलेली ही वाक्य आवडलेली नाहीत. कोणाचाही अंत किंवा कोणाचाही शेवट करण्याची ताकद तुमच्यात नाही. ती फक्त ईश्वरात आहे. तेव्हा वाक्य जपून वापरा. आणि हा जो तुम्ही एलईडी बोर्ड काढला आहे त्यामुळे संपूर्ण मुंब्रा आणि कळव्याच्या जनतेच्या मनामनामध्ये असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना तुम्ही कधीच काढू शकत नाहीत. हे स्पष्टपणाने मी तुम्हांला सांगू इच्छितो.” असंही यामध्ये म्हटलं आहे.

याचबरोबर, “ज्यांना कळव्यात चालू असलेली ८-८ मजल्याची इमारतीची बांधकामे दिसत नाहीत. त्यांना मात्र एलईडी बोर्ड दिसतो. अर्थात आम्हांला माहीत आहे कि तो कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आला. पण फक्त सांगकाम्याची कामे करू नका आपली जबाबदारीही ओळखा.” असंही पोस्टद्वारे सांगण्यात आलं आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhads tweet saying how much is the politics of revenge is in discussion a sign of controversy in thane msr