डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पत्नी रश्मी, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक माजी मंत्री रामदास कदम यांचा निषेध करण्यासा्ठी बुधवारी सकाळी शिवसेना डोंबिवली मध्यवर्ति शाखेतर्फे रामदास कदम यांच्या फलक, प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावेळी गद्दार गद्दार असा उल्लेख करुन शिवसैनिक रामदास कदम यांचा धिक्कार करत होते.शिवसेना पक्षाने सर्व काही भरभरुन दिले असताना माजी मंत्री रामदास कदम हे खाल्ले तेथेच गरळ ओकत असतील तर अशा गद्दाराला महाराष्ट्रातील जनता मातीमध्ये गाडून टाकील, असा इशारा शिवसेनेचे कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रामदास कदम यांना जोडे मारण्याचा कार्यक्रम डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी रामदास कदम यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करुन राज्यातील तमाम महिला वर्गाचा अपमान केला आहे, अशी टीका करत आपल्या पायातील चपला काढता रामदास कदम यांच्या तसबिरी, फलकावरील छायाचित्रावर मारल्या. गद्दार, गद्दार घोषणांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला होता. हा कार्यक्रम सुरू असताना पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : रामदास कदम यांनी केलेल्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ पुण्यात फोटोला जोडे मारो आंदोलन

‘विधानसभेत वर्णी लागावी म्हणून रामदास कदम मी कसा ठाकरे घराण्याच्या विरोधात आहे हे दाखविण्यासाठी ते आता गरळ ओकत आहेत. जवळ पद नसल्याने ते वेडे झाले आहेत. त्यांच्या मेंदुवर परिणाम झाला आहे. त्यांना आता जनावरांच्या लम्पी आजाराचे इंजेक्शन देण्याची वेळ आली आहे. कदम आणखी पातळी सोडून आपली बेताल वक्तव्य सुरूच ठेवली तर डोंबिवली महिला आघाडी ते असतील तेथे, कोकणात जाऊन त्यांचे कपडे काढून त्यांची वरात काढतील,’ असा इशारा शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी मंगला सुळे यांनी दिला. अश्लाघ्य शब्दात रामदास कदम यांचा उल्लेख करुन त्यांच्या नावाच्या घोषणा शिवसैनिकांकडून दिल्या जात होत्या. या कार्यक्रमात शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, तात्या माने, महिला पदाधिकारी वैशाली दरेकर, कविता गावंड, अरविंद बिरमोळे, सतिश मोडक आणि शिवसैनिक सहभागी झाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jode maro protest against of ramdas kadams that statement dombivali tmb 01