डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर कायमचा फेरीवाला मुक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने वाहतूक पोलीस, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रामनगर पोलीस, आरटीओ अधिकारी यांच्या सहकार्याने फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार संयुक्त मोहीम सुरू केली आहे. सकाळ, संध्याकाळी ही कारवाई सुरू राहत असल्याने रेल्वे स्थानक भागातील रस्ते फेरीवाला मुक्त राहत असल्याने पादचारी समाधान व्यक्त करत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून डोंबिवली पूर्व भागात ग आणि फ प्रभागाकडून रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर सतत कारवाई करूनही फेरीवाले हटत नसल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून पालिकेने संयुक्त मोहिमेव्दारे फेरीवाले हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे पोलीस, वाहतूक पोलीस, रामनगर पोलीस, आरटीओ अधिकारी सहभागी होत असल्याने रेल्वे स्थानक परिसर मागील पाच दिवसांपासून फेरीवाला मुक्त झाला झाला आहे.
पालिकेच्या ग प्रभागाचे संजयकुमार कुमावत, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जव्वाद डोन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई केली जात आहे. यापूर्वी कारवाई सुरू झाली की फेरीवाले रेल्वेचे स्वच्छता गृह, स्कायवाॅकवर, रेल्वे तिकीट खिडक्यांच्या कोपऱ्याला लपून बसत होते. पालिका पथक कारवाई करून गेले की पुन्हा रस्त्यावर बसत होते. आता रेल्वे हद्दीत फेरीवाले लपण्यासाठी गेले की तेथे रेल्वे सुरक्षा बळाचे जवान त्यांना तेथून हाकलून देत आहेत. स्वच्छता गृहात, रेल्वे हद्दीत लपवून ठेवलेले सामान फेकून देत आहेत.
वाहतूक पोलीस, रामनगर पोलीस रिक्षाचालक रेल्वे स्थानक भागात बेशिस्तीने उभ्या केलेल्या रिक्षा, खासगी वाहने यांच्यावर कारवाई करत आहेत. अनेक फेरीवाले या वाहनांचा आडोसा घेऊन व्यसाय करायचे. फेरीवाल्यांचा हा लपून व्यवसाय करण्याचा धंदा कारवाई पथकाने हाणून पाडला आहे. या सततच्या कारवाईने सोमवारचा पूर्व भागातील फेरीवाल्यांचा बाजार बंद झाला आहे.
हेही वाचा – शिंदेंच्या जवळचा आमदार म्हणतोय, माझी हत्या झाली तरी चालेल… फेसबुक पोस्ट व्हायरल
या कारवाईमुळे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पाटकर रस्ता, उर्सेकरवाडी, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, फडके रस्ता, आयरे रस्ता, शिवमंदिर रस्ता, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी परिसर फेरीवाला मुक्त राहत आहे. सकाळ, संध्याकाळी ही कारवाई संयुक्त पथकाकडून केली जात असल्याने फेरीवाल्यांची दाणादाण उडाली आहे. फेरीवाला हटाव पथकातील काही कामगार फेरीवाल्यांशी संंधान साधून फेरीवाल्यांना रस्त्यावर बसण्यासाठी उद्युक्त करायचे. त्यांचाही धंदा आता संयुक्त कारवाईमुळे बंद झाला आहे. कारवाईत फेरीवाले, पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या दुकानादारांचे सामान जप्त केले जात आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यासाठी ग आणि फ प्रभाग फेरीवाला हटाव कारवाई पथकासह रेल्वे, रामनगर आणि वाहतूक पोलीस सहभागी होत आहेत. फेरीवाल्यांविरुद्धचीही संयुक्त कारवाई मोहीम नियमित सुरू ठेवण्यात येऊन पूर्व भाग फेरीवाला मुक्त केला जाणार आहे. – संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग क्षेत्र.