जोशी-बेडेकर महाविद्यालयातील गंधर्व महोत्सव त्यातील वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमांमुळे महाविद्यालयीन विश्वात आता बराच लोकप्रिय झाला आहे. अतिशय कल्पक कार्यक्रम हे गंधर्वचे वैशिष्टय़ मानले जाते. या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकसत्ता’ आहे.
२० व २१ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या यंदाच्या महोत्सवात ४० हून अधिक कार्यक्रम पार पडणार आहेत या कार्यक्रमांची विभागणी परफॉर्मिग, लिटररी, फाइन आर्ट्स, स्पोर्ट्स आणि इतर अशा पाच भागांमध्ये करण्यात आली आहे.
महोत्सवाची व्यवस्था पाहण्यासाठी ६० ते ७० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी आशीष पांडे, एकता बिष्ट, अनिकेत पाटील आणि रुही ठाणावाला हे महोत्सव समितीचे सदस्य आहेत. नृत्य, संगीत, वादविवाद, वक्तृत्व, फ्रेम मेकिंग, डुडलिंग, क्रॉस फिट हे काही ठळक इव्हेंट्स आहेत. सगळ्या स्वयंसेवकांना त्यांची कामे विभागून देण्यात आली आहेत. सर्व संबंधित जोमाने महोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. (सागर रणशूर)
आकांक्षा महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
बांदोडकर महाविद्यालयात आकांक्षा महोत्सवाच्या निमित्ताने निरनिराळ्या स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. यंदाच्या महोत्सवासाठी ‘शेड्स ऑफ इंडिया’ ठेवण्यात आली होती. भारतातील निरनिराळ्या महत्त्वपूर्ण प्रसिद्ध गोष्टींना अनुसरून त्याचे सादरीकरण या महोत्सवाच्या निरनिराळ्या स्पर्धामध्ये करण्यात आले होते. रांगोळी, मेहंदी, केशभूषा, रंगभूषा, टॅटू मेकिंग, वेजी आर्ट, फ्लॉवर आर्ट, गायन, नृत्य, फॅशन शो, व्यक्तिमत्त्व स्पर्धा यांसारख्या निरनिराळ्या स्पर्धाचे आयोजन या स्पर्धामध्ये करण्यात आले होते. आकांक्षा महोत्सवात रस्सीखेच, लगोरी, चमचा लिंबू, खजिना शोध, तीन पायांची शर्यत यांसारख्या भारतीय देशी मैदानी खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच सारी डे, टाय डे, मिक्स मॅच डे, चॉकलेट डे, मास्क डे, ट्रॅडिशनल डे यांसारख्या डेजमध्ये विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. (ऋषिकेश मुळे)
नो मोबाइल डे
नो मोबाइल डेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एक दिवस मोबाइल न वापरण्याचा संकल्प केला. या दिवशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर केला नाही. मोबाइल सॅव्ही झालेले महाविद्यालयीन तरुण या दिवशी मोबाइलपासून दूर राहून एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना दिसत होते.
स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तरुणांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा गोवेली महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. स्वच्छतेबाबत तरुणांची मते आणि विचार ऐकून घेण्यासाठी कल्याण तालुका पंचायत समितीतर्फे स्वच्छ भारत मिशन आयोजित तालुकास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक ही स्पर्धा घेण्यात आली. गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात ही स्पर्धा पार पडली. स्वच्छतेची आवड सुंदरतेची निवड, गाडगेबाबांना मानूया स्वच्छतेला मानूया, शुद्ध पाणी आरोग्याची हमी, संत साहित्यातील स्वच्छता आणि माझ्या स्वप्नातील हागणदारीमुक्त गाव असे स्वच्छतेवरील विषय विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत देण्यात आले होते.
कल्याण तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील ४० विद्यार्थ्यांनी या तालुकास्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेत आपले विचार मांडले. कनिष्ठ गटातून बिर्ला महाविद्यालयातील प्रतीक्षा बांगर आणि मृणाल सापळे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच जीवनदीप महाविद्यालयातील सुचिता जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला. वरिष्ठ गटातून बिर्ला महाविद्यालयातील अश्विनी निकम हिने प्रथम आणि शिवाजी जोंधळे महाविद्यालयाच्या रोनक चौगुले याने द्वितीय क्रमांक पटकावला. जीवनदीप महाविद्यालयातील राजेश गोंधळी याला तृतीय क्रमांक मिळाला. तालुकास्तरीय स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना गटशिक्षण अधिकारी डॉ. घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ भारतचा संकल्प करण्याचा निश्चय करण्यास सांगितले. (प्रशांत घोडविंदे)
कॉलेज डेज्ना सामाजिक बांधिलकीची जोड
कॉलेज डेज् हा फक्त मजा करण्याचा दिवस असा समज ठाण्याच्या ज्ञानगंगा महाविद्यालयाने मोडीत काढला. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॉलेज डेज्मधून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. १३ डिसेंबर रेड डे या दिवशी रक्तदान दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी व कर्मचारीवर्गाने रक्तदान केले. १४ डिसेंबर रोजी ग्रीन डे साजरा करण्यात आला या दिवशी मुलांनी पर्यावरण-संवर्धनाचा संदेश देत फळे, भाजीविक्रेत्यांना रद्दी पेपरच्या पिशव्यांचे वाटप केले. तसेच ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचा संदेश देत कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती केली. १५ डिसेंबर रोजी ब्लॅक अॅण्ड व्हाइट डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलभूत कर्त्यव्यांची माहिती करून देण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी अॅडव्होकेट प्रतीक्षा जोशी यांच्याशी चर्चा केली. १७ डिसेंबर रोजी ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात आला. २० डिसेंबरला विद्यार्थ्यांनी कॅप अॅण्ड हॅट डे साजरा केला. या दिवशी कासारवडवलीपर्यंत रॅली काढून स्त्री-भ्रूणहत्या, स्त्री-शिक्षण व बालकामगारविरोधी जागृती केली.