पावसाळय़ाच्या दिवसात डोंगरदऱ्यांतील ट्रेकिंगचा आनंद आणि अनुभव काहीतरी वेगळाच असतो. निसर्गाच्या कुशीत हिंडत असताना प्रसंगी मार्गात अडथळेही उभे ठाकतात. पण चढाईचा निर्धार करून घराबाहेर पडलेला ट्रेकर कधी मागे फिरत नाही. हे साहस, थरार, रोमांच अनुभवण्यासाठीच तर सारा बेत आखलेला असतो. अशाच एका रोमांचक ट्रेकचा हा वृत्तान्त..
पावसाची थोडीफार का असेना, सुरुवात झाली होती. त्यात बरेच दिवसांपासून आमच्या जुन्या ग्रुपचा काही ट्रेक असा ठरत नव्हता. मग ‘फेसबुक’वरील सर्व जुन्या भिडूंना आवाहन केले. चांगला प्रतिसाद मिळाला. ७-८ जण तयार झाले व त्यातल्या काहींनी मोक्याच्या क्षणी टांग मारली. उरलो आम्ही चार. पण ‘ट्रेक’ करायचे मनोमन ठाम केले होते. त्यामुळे चौघांनीच निघायचे ठरवले. ध्येय होते नाणेघाटातून चढाई करून भोरांडय़ाच्या दाराने खाली उतरायचे.
नाणेघाटाच्या उजव्या बाजूला उंच टेकडीच्या बाजूने एक सरळ वाट खाली उतरते, तिलाच भोंराडय़ाचे दार म्हणतात. खाली उतरून भोंराडेत अथवा मोरोशीत जाता येते. या वाटेबद्दल काही जास्त माहिती नाही. या वाटेचा वापर क्वचितच होतो. हौशी ट्रेकरही अभावानेच या वाटेचा ‘ट्रेक’ निवडतात. स्थानिकही नाणेघाटातूनच ये-जा करतात.
ठरविल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता मी, निखिल अहिरे, मयूर पुणतांबेकर आणि उत्तम शिंदे कल्याण बस स्थानकात शिरलो. लगेचच माळशेज घाटमार्गे जाणाऱ्या कल्याण-शिवाजीनगर (पुणे) एसटीत बसलो. साधारण दोन-अडीच तासात नाणेघाट फाटय़ावर उतरलो. नाणेघाटात बऱ्याचदा चढाई झाल्या असल्याने येथील परिसर बऱ्यापैकी पायाखालचा होतो. दोन अडीच तासात आम्ही नाणेघाटातील गुहेत पोहोचलो.
जरा वेळ गुहेत विसावलो तर, आकाशात ढगांची गर्दी जमू लागली आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली. गुहेच्या बाहेर डाव्या हाताला पाण्याची टाकी आहे. समोर आणि वरच्या अंगाला आणखी काही लहान लहान गुहा आहेत. पावसाची बारीक उघडझाप सुरू होती. धुके येत-जात होते. संपूर्ण वातावरण भारून टाकणारे होते. मग जास्त वेळ न थांबता आणि सरळ पठारावर दाखल झालो. तेथून धुक्यात लपलेला जीवधन किल्ला दिसला. नानाच्या अंगठय़ावर गेलो (पठारावरील उंचवटा, ज्याच्या पोटातच गुहा आहे.) बाजूलाच गणेश गुहा आहे. वर गेल्यावर खाली दूरवर कोकणातील वैशाखरे, टोकावडे ही गावे दिसली. उत्तरेला हलकेसे भैरवगडाचे दर्शन झाले, तर दक्षिणेला ठाकोबा, दुर्ग, आहुपे घाटाचा कडा, गोरख-मच्छिंद्रगड अधूनमधून दिसत होते. पठारावर बरीच गर्दी जमू लागली होती. तिथेच घाटावर गावातील दोन स्थानिक तरुण भेटले. त्यांना भोरांडय़ाच्या दाराबद्दल माहिती विचारली. आम्हाला माहिती होती. मात्र, पावसाळय़ाच्या दिवसात त्या वाटेची काय अवस्था आहे, हे जाणून घ्यायचे होते. पाऊस एव्हाना चांगलाच बरसू लागला होता आणि धुकेही वाढत होते. शेवटी त्या दोघांपैकी एकाला आम्ही घाटाच्या मुख्य सुरुवात जिथून होते त्या दारापर्यंत सोबत घेतले. कारण वातावरणात पठारावर वाट शोधण्यात आम्हाला वेळ घालवायचा नव्हता. एव्हाना दुपार झाली होती. चौघेही प्रथमच या वाटेने जात होतो.
पठारावरील करवंदे खात खात अध्र्या तासाच्या चालीनंतर, भोंराडय़ाच्या दारापाशी आलो. परत धुके जमायला सुरुवात झाली. खाली दरीत काहीच स्पष्ट दिसत नव्हते. पण ती उतरती नाळ बघून मला तर मिगुणधारा, डोणीदार घाटाची आठवण झाली. बऱ्यापैकी खडी-उतरण आणि नाळेतले मोठमोठे धोंडे, दगडी, साधारणपणे उतरताना हा ओढा उजव्या हाताला असावा, ही थोडी माहिती होती. वाट थोडी डावीकडून पुढे सरळ खाली उतरून, ओढय़ाच्या साथीने राका पुलाजवळ मुख्य मुरबाड-माळशेज रस्त्यावर मिळते. जिथे भोरांडा द्वार वॉटरफॉल हा बोर्ड लावला आहे, हे माहीत होते. न चुकता सरळ खाली उतरलात, तर साधारण तासाभरात खाली पोहोचाल, असे गणेश, आमच्यासोबतचा स्थानिक तरुण म्हणाला. त्याने तिथूनच आमचा निरोप घेतला. आम्ही उतरणीच्या मार्गाला लागलो. पण काही मिनिटांतच जोरदार पाऊस सुरू झाला. धुके दाट झाले होते. त्यात नाळ तीव्र उताराची होती. अरुंद वाटेच्या बाजूला असलेल्या कातळ भिंतीवरून पाण्याचे लोट वाहू लागले. अंधारही दाटून आला.
आम्ही अतिशय सावधपणे सांभाळून पुढे सरकत होतो. पहिल्या १० ते १५ मिनिटातच थोडे खाली आल्यावर डावीकडे कडय़ाला चिकटून जाणारी वाट दिसली. ती वाट हळूहळू उतरू लागलो. मुख्य पुढची वाट दिसेनाशी झाली होती. खाली तीव्र उतरण आणि प्रचंड प्रमाणात झाडा-पाचोळा, पावसाने पण चांगलेच झोडपले होते. थोडे पुढे उजवीकडे सरकल्यावर तिकडच्या ओढय़ापलीकडे एक वाट सरळ उजवीकडून वळसा मारत पुढे जात होती. वाट अत्यंत ठळक होती. पण दिशेनुसार मनात शंका आली, कारण आम्हाला सरळच खाली उतरायचे होते. मग मी आणि निखिल आम्ही त्या वाटेला पुढे जाऊन पाहायचे ठरविले. त्या जागेवर मयूर आणि उत्तम यांना थांबायला सांगून, आम्ही दहा ते पंधरा मिनिटे त्या वाटेवर चालत होतो. मग लक्षात आले, ही वाट जरी ठळक असली तरी ती ओढय़ाला धरून खाली उतरत नाहीये. ही कदाचित लाकूडतोडे किंवा गुराख्यांची वाट असेल? किंवा पदरातून सरळ आडवी मोरोशी किंवा भैरवगडाच्या दिशेला तर जात नसेल? पुन्हा माघारी आलो.
जरा वेळ शांतपणे विचार केला, सरळ दिशा धरून समोरच्या सटकणाऱ्या कातळावरून सावकाश उतरल्यावर, पुढे गेल्यावर झाडीत एक वाट अस्पष्टशी दिसली. पुढे जात वाटेतल्या फांद्या-काटक्या बाजूला सारत हळूहळू खाली उतरू लागलो. मध्येच वाट नाहीशी होत मग पुन्हा उजव्या-डाव्या बाजूने अंदाज घेत वाटेला लागत होतो. नाणेघाटाच्या तुलनेत ही वाट कमी वापरातली असल्यामुळे थोडे अवघड जात होते. पण तरीही हा एक वेगळाच अनुभव होता. नेटाने पुढे पुढे जात होतो. एव्हाना पाऊस कमी झाला होता व धुकेही गायब झाले होते. आम्ही बरेच अंतर खाली उतरलो होतो. मागे वळून सरळ पाहिले तर भोरांडय़ाच्या दारावर धुके ये-जा करत होते. म्हणजेच आम्ही दिशेप्रमाणे योग्य वाटेला होतो. काही मिनिटात उतरण कमी झाल्यावर तो नाळेतला मोठा ओढा उजव्या हाताला लागला. थोडे पुढे गेल्यावर काही ठिकाणी सिमेंट बंधाऱ्याचे काम केलेले दिसले. जरा पुढे लगेचच सिमेंट काँक्रीटची वाट आणि मुरबाड-माळशेज महामार्गावरचा पूल दिसला. बाजूच्या ओढय़ातच तोंड-हातपाय धुऊन निवांत झालो आणि परतीच्या वाटेवर कल्याणकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो. एका दिवसात दोन सुंदर घाटवाटांची यात्रा झाली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा