डोंबिवली : करोना महासाथीमुळे गेल्या दोन वर्षात डोंबिवलीतील फडके रोडवर दिवाळी पहाट साजरी करण्यास शासन आदेशानुसार महापालिका, पोलिसांकडून मज्जाव होता. दोन वर्ष करोनामुळे घरात अडकून पडलेल्या तरुणाईचा हिरमोड झाला होता. आता करोना महासाथीला पूर्णविराम मिळाल्यामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर सोमवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोड तरुणाईच्या जल्लोषाने भरुन गेला होता.
दोन वर्ष फडके रोडवर दिवाळी पहाट, युवा भक्ती शक्ती दिन साजरी करण्याची संधी न मिळाल्यामुळे दडपून राहिलेला तरुणांचा उत्साह, जल्लोष फडके रोडवर सोमवारी सकाळी ओसंडून वाहत होता. विविध प्रकारच्या पेहरावात तरुण, तरुणी, बच्चे मंडळी, नवविवाहित दाम्पत्य डोंबिवली गावचे ग्रामदैवत श्री गणपतीच्या दर्शनासाठी आणि फडके रोडवरील दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक, आप्पा दातार चौकात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. डोंबिवलीसह ठाणे, दिवा, लोढा पलावा, कल्याण, बदलापूर परिसरातून तरुण, तरुणींचे मित्र-मैत्रिणी सकाळीच डोंबिवलीत आले होते. सकाळी सहा वाजल्यापासून तरुण, तरुणींचे जथ्थे फडके रोडवर येऊ लागले. फडके रोडवर वाहतूक कोंडी, अनुचित प्रकार टाळण्यासाठी या रस्त्याच्या चारही बाजुने पोलीस, वाहतूक पोलीस तैनात होते. फडके रोडच्या चारही बाजुच्या रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहने उभी करण्यात आल्याने परिसरात मात्र वाहन कोंडी होत होती.
जुनी प्रथा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रोडवर ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जमायचे. ही डोंबिवलीतील मागील ५० ते ६० वर्षापासुनची परंपरा. या परंपरेतून अनेकांच्या रेशीम गाठी फडके रोडवर जुळल्या, असेही सांगण्यात येते. फडके रोडवर आता डोंबिवलीतील नागरिकांची तिसरी, चौथी पीढी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी साजरी करण्यासाठी येते.मित्रांशी महाविद्यालय, नोकरीच्या ठिकाणी नियमित संपर्क आला तरी फडके रोडवर एकत्र येऊन भेटण्याची मजा अधिकची असते. डोंबिवली परिसरातील अनेक परदेशस्थ आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आवर्जून फडके रोडची निवड करतात. दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरेदी केलेला मोबाईल, नवीन कपडे, पादत्राणे अशी मित्रांच्या गटात चर्चा सुरू असते. दोन वर्षाच्या खंडानंतर एकत्र आल्याने अनेक जण गळामिठी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देत होते. बालगोपाळ मंडळी आपल्या पालकांबरोबर सजून नटून आली होती. बाजीप्रभू चौकापासून ते आप्पा दातार चौक आणि लगतच्या रस्त्यांवर हास्यवदनाने तरुण, तरुणी आपल्या मित्रांना शुभेच्छा देत होते. काही तरुण शोभेचे फटाके फोडण्यात दंग होते. गटागटाने मोबाईल मध्ये स्वछबी (सेल्फी) काढण्यासाठी मित्र, मैत्रिणींच्या गटांमध्ये चढाओढ सुरू होती.
हाॅटेल, बाजुच्या चहा टपऱ्या चहा नाष्टासाठी गजबजून गेल्या होत्या. पेहरावांवरील सुगंधी दरवळ वातावरणात पसरला होता. फडके रोडवर येणाऱ्या तरुणाई, ज्येष्ठ मंडळींच्या मनोरंजनासाठी श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे स्वप्ना कुंभार-देशपांडे यांच्या संकल्पनेतील नृत्यम भारनाट्यम व लोकनृत्य संस्थेचा पारंपारिक लोकनृत्याचा नृत्यरंग कार्यक्रम आयोजित केला होता. व्यासपीठांवरील गाण्यांवर ठेका धरुन रस्त्यावर तरुण, तरुणी नृत्य सादरीकरण करत होते.
कलाकारांची उपस्थिती
फडके रोडची दिवाळी अनोखी असल्याने कलाकार, राजकीय नेते आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावतात. यावेळी अभिनेत्री श्रृती मराठे, अनिता दाते यांनी यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली. उन्ह चढायला लागली तसा मग तरुण, तरुणींनी घरुन आणलेल्या फराळावर रस्त्यावरच ताव मारण्यास सुरुवात केली. ढोलताशे, इतर गाण्यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे ढणढणाटाचे वातावरण नव्हते. तरुणांबरोबर ज्येष्ठ, वृध्द रांगेत राहून गणपतीचे दर्शन घेत होते. फडके रोडवरील वाहतूक अन्य रस्त्यांनी वळविण्यात आली होती.रविवारी संध्याकाळी राजकीय मंडळींनी आप्पा दातार चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे फडके रोडची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी सकाळीही दिवाळी पहाटमुळे फडके रोड बंद ठेवण्यात आल्याने रिक्षा चालक, प्रवासी नाराजी व्यक्त करत होते.