कुळगाव-बदलापूर पालिकेच्या आरक्षण सोडतीचा घोळ सुटता सुटत नसून या आरक्षण सोडतीच्या आजवरच्या सावळ्या गोंधळामुळे एका अधिकाऱ्याचा नाहक बळी गेला आहे. पालिकेचे नगर अभियंते प्रवीण कदम यांना एकटय़ालाच या गोंधळाबद्दल जबाबदार धरून निलंबित करण्यात आले.
२१ जानेवारीला बदलापूर पालिकेच्या प्रभाग आरक्षणांची सोडत झाली होती. या सोडतीमध्ये प्रभाग क्र २१वर चुकीचे आरक्षण पडले होते. याबद्दल साकिब गोरे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. या हरकतीवर सुनावणी होऊन ही हरकत मान्य करण्यात येऊन प्रभाग क्र २१वर प्रशासनाच्या चुकीमुळे पडलेले आरक्षण बदलण्यासाठी फेरसोडत झाली. फेरसोडत घ्यावी लागल्याचा व चुकीच्या माहितीचे सूत्रसंचालन करताना उल्लेख केल्याचा ठपका ठेऊन नगर अभियंता प्रवीण कदम यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी दिली. परंतु २१ जानेवारीच्या सोडतीमध्ये सोडत होताना केवळ सूत्रसंचालकाची भूमिका निभावणाऱ्या नगर अभियंता कदम यांच्या एकटय़ावरच ठपका ठेवल्याने पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण सोडतीच्या वेळी मुख्य भूमिका पार पाडणारे सामान्य प्रशासनचे अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बजावयाची सोडतीच्या सूत्रसंचालकाची भूमिका पालिकेच्या नगर अभियंत्यांकडे कशी आली यावरच सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शासकीय नियमांप्रमाणे सोडत प्रक्रियेची रंगीत तालीम अधिकाऱ्यांनी यापूर्वी पार पाडली होती का; जेणेकरून सोडत प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे सोडतीवरील हरकतदारांचा मूळ प्रश्न बाजूला राहिला असून हरकत घेऊन फेरसोडत झाली तरी आपल्या मागण्यांना न्याय मिळाला नसून एका अधिकाऱ्याचा यात नाहक बळी गेला आहे. त्यामुळे या सोडतीच्या मुद्दय़ावर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे हरकतदार गोरे यांनी सांगितले. यामुळे पालिका वर्तुळात खळबळ माजली असून निर्दोष अधिकाऱ्याचा बळी गेल्याची चर्चा होत आहे.
संकेत सबनीस, बदलापूर

Story img Loader