कल्याण-डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची चलाखी
डोंबिवली पूर्व भागातील स्कायवॉकवरील छताच्या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी तसेच पूर्व भागात फेरीवाल्यांनी मांडलेला पसारा पाहण्यासाठी आयुक्त ई. रवींद्रन यांनी मंगळवारी उशिरा या भागातील स्कायवॉक परिसराला भेट दिली. आयुक्त, महापौर राजेंद्र देवळेकर रेल्वे स्थानक भागात येणार असल्याची माहिती मिळताच चाणाक्ष महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांना सावध करून परिसरातून बेपत्ता केले. त्यामुळे हा दौरा सुरू होण्यापूर्वी काही तास अगोदर रेल्वे स्थानक परिसरात ठिय्या मांडून बसलेल्या फेरीवाल्यांची अचानक सुरू झालेली पळापळ पाहून डोंबिवलीकरांचे चांगलेच मनोरंजन झाले.
फेरीवाल्यांविरोधात महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. फेरीवाल्यांचे साहित्य जप्त केले जात आहे. त्यांच्या टपऱ्या जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यापर्यंत महापालिकेने पाऊल उचलले आहे. तरीही महापालिकेच्या ग प्रभागात येणाऱ्या पाटकर रस्त्यावरील कामत औषध दुकानासमोरील फेरीवाले मात्र आपले स्थान सोडण्यास अजिबात तयार नाहीत. हे फेरीवाले सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पदपथ अडवून बसलेले असतात. मंगळवारी उशिरा आयुक्त येणार असल्याची खबर मिळताच या ठिकाणच्या सुमारे ५० फेरीवाल्यांची पळापळ सुरू झाली.
या दौऱ्यापूर्वी रॉथ रस्ता, वाहतूक कार्यालय, उर्सेकर वाडी परिसरात एकही फेरीवाला दिसणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था प्रभाग कार्यालयातून करण्यात आल्याचे सांगितले जाते. दुपारी तीन वाजल्यापासून पूर्व भागातील रस्ते फेरीवालामुक्त दिसत असल्याने पादचारी समाधान व्यक्त करीत होते. कोणतीही पूर्वसूचना न देता आयुक्तांनी हा दौरा आखला असता तर नेमके वेगळे चित्र दिसले असते, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
डोंबिवली पूर्व भागातील ग प्रभागाचे नियंत्रण असलेल्या रेल्वे स्थानक भागात आयुक्तांनी एकदा फेरी मारावी. म्हणजे त्यांना फेरीवाला हटाव पथक कशा बनावट कारवाया करून खोटे कारवाईचे अहवाल सादर करते, याचा अनुभव येईल, अशी चर्चा पादचाऱ्यांमध्ये सुरू होती. फ प्रभागात सकाळ, संध्याकाळ फेरीवाल्यांना हटविण्याचा कारवाई सुरू असल्याने फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणीगल्ली परिसर येजा करण्यासाठी मोकळा राहत असल्याने पादचऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानक परिसराचा प्राधान्याने विकास करण्यात येणार आहे. डोंबिवली स्थानक भागात कशा प्रकारे नागरी सुविधा देता येतील याची पाहणी आयुक्त, महापौरांनी केली.
स्कायवॉकला विळखा कायम
कल्याण पश्चिम भागातील फेरीवाल्यांची महापालिकेने दाणादाण उडवली आहे. रस्ते, पदपथावर सध्या एकही फेरीवाला दिसत नाही. हेच फेरीवाले सामानासह स्कायवॉकवर जाऊन बसत असल्याने फलाटावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना स्कायवॉकवरून चालणे मुश्किल झाले आहे. स्कायवॉकवरील रेल्वेच्या हद्दीत फेरीवाल्यांना बसण्यास रेल्वे सुरक्षा जवानांनी मज्जाव केला आहे. त्यामुळे सुमारे १०० फेरीवाले पालिका हद्दीतील स्कायवॉकवर ठाण मांडून बसत आहेत. पालिका कर्मचारी, रेल्वे पोलीस, गुंड, भाईंच्या आशीर्वादाने हे फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे समजते.