लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने लोकाभिमुख कार्यक्रम आपण करत असतो. म्हणूनच यादिवशी मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेऊन समाजाला न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची शनिवारी सर्वत्र जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने ठाणे येथील खारकर आळी भागातील आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन उपस्थितांची संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार मिलिंद देवरा, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे उपस्थित होते.

आणखी वाचा-कल्याणमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना लुटले

गुरुवर्य आनंद दिघे यांची जयंती आपण विविध उपक्रमांनी साजरा करतो. समाजास उपयुक्त असे लोकाभिमुख कार्यक्रम आयोजित करतो. दिघे यांनी आपल्याला जी काही शिकवण दिली आहे, त्या आदर्श मार्गाने आपण ठाणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात काम करीत आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत. त्यामुळेच आनंद दिघे यांच्या जयंती दिवशी आपण मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गेले अनेक वर्षे सोयीसुविधांपासून वंचीत असलेल्या मराठा समाजाला दिघे यांच्या जयंती दिवशी आपण न्याय दिला आहे. ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय दिला आहे. मराठा समाज सवलती पासून आजपर्यंत वंचित होता. परंतु त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेण्याचे काम आपल्या सरकारने केले, याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-पालघरच्या समुद्र किनारी ‘अफगाणी’ चरसची पाकिटे ? ८० लाख रुपयांचा चरस विक्री करताना मच्छीमार ठाणे पोलिसांच्या जाळ्यात

आनंद दिघे यांच्या नावाने योजना

महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या सर्व प्रस्तावित योजनांमध्ये सबसिडी योजना आहे. त्याला धर्मवीर श्री आनंद दिघे लाभ समर्पण योजना असे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. गुरुवर्य आनंद दिघे यांनी समाजाची सेवा करताना त्यागी वृत्तीने काम केले. सर्व समाजाला आपले कुटुंब मानून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याच मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. गोरगरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना दिघे यांची होती. त्यांच्या दरबारात समस्या घेऊन येणारा हसतमुखाने परत जात होता. म्हणूनच त्यांच्या नावाची योजना सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जे आर्थिक दृष्ट्या खूप श्रीमंत आहे आणि गोरगरिबांना ज्याची आवश्यकता अशा प्रकारच्या लाभाची योजना समर्पित करण्यासाठी ही योजना आहे. दिघे यांनी आपले जीवन संपुर्णपणे लोकसेवा आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. त्यामुळेच राज्य सरकारने त्यांच्या नावाने ही योजना सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justice done to maratha community on anand dighes birth anniversary says cm eknath shinde mrj
Show comments