एकीकडे आरोग्यम् धनसंपदा म्हटले जात असले तरी त्यासाठी आवश्यक असणारी व्यवस्था मात्र सर्वसामान्यांना मिळणे दुरापास्त आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये फारशा सुविधा उपलब्ध नसतात आणि खासगी वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च गरिबांना परवडत नाही. अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मागणी करूनही शासनाला आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करता आलेली नाही. परिणामी काही अपवाद वगळता ठिकठिकाणची सरकारी आरोग्य केंद्रच आजारी असल्याचे आढळून येते. विविध विश्वस्त संस्थांमार्फत चालवली जाणारी अल्पदरातील आरोग्य सेवा केंद्रे त्यावर उत्तम पर्याय ठरीत असल्याचे दिसून येत आहे. विस्तारित मुंबईचे दूरचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदलापूरमध्ये स्थापन झालेल्या काका गोळे फाऊंडेशनने दोन वर्षांपूर्वी तशा प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली असून, शहर तसेच परिसरातील हजारो ग्रामस्थ त्याचा लाभ घेत आहेत.
आशीष गोळे हे बदलापूरमधील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व. ज्या समाजात आपण राहतो, त्याचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेने त्यांनी त्यांचे आजोबा काका गोळे यांच्या नावे फाऊंडेशन स्थापन करून त्याद्वारे आरोग्य, शिक्षण आणि अभिरुचीसंपन्न मनोरंजन अशा स्वरूपाचे उपक्रम दोन वर्षांपूर्वी सुरू केले. या उपक्रमांसाठी गोळेंनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली स्वत:ची विस्तीर्ण जागा उपलब्ध करून दिली. अर्थात त्यासाठी त्यांना त्यांचे वडील वामन गोळे यांनी सहकार्य केले.
दोन वर्षांपूर्वी काका गोळे फाऊंडेशनने पॅथॉलॉजी लॅब सुरू केली. या लॅबमध्ये विविध प्रकारच्या तपासण्या ५० टक्के दरात उपलब्ध आहेत. गेल्या दोन वर्षांत हजारो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. त्याच्या जोडीनेच ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर आरोग्याचे विविध उपक्रम फाऊंडेशनने राबविले. त्यात ‘डॉक्टर आपल्या भेटीला’, कॅन्सर व्याधीविषयी तपासणी, संकल्प दवाखाना, व्याख्यानमाला आदी उपक्रमांचा समावेश आहे. सर्वसामान्य रुग्णांना किफायतशीर दरात आरोग्य सेवा मिळावी, हे फाऊंडेशनचे मुख्य ध्येय आहे. मात्र त्याजोडीने सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही फाऊंडेशन कार्यरत आहे. शैक्षणिक समुपदेशन, परदेशी भाषांचे वर्ग, अभ्यासिका आदी अनेक उपक्रमही फाऊंडेशने या वास्तूमध्ये सुरू केले आहेत. याशिवाय फाऊंडेशनने पॅथॉलॉजी लॅबसमोरील मोकळ्या जागेत एक खुले व्यासपीठ बदलापूरमधील सांस्कृतिक उपक्रमांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. गेली दोन वर्षे ‘प्रतिभावंत बदलापूरकर’ हा उपक्रम फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविला जात आहे. या उपक्रमात दरमहा विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्या एका प्रतिभावंत बदलापूरकराची प्रकट मुलाखत घेतली जाते. गेल्या दोन वर्षांत तब्बल १६ हजारांहून अधिक नागरिकांनी या बहुउद्देशीय प्रकल्पाला भेट दिली आहे. केवळ आरोग्यसेवेचाच विचार केला तर सर्वसामान्य नागरिकांचे २० लाख रुपये फाऊंडेशनने वाचविले आहेत.
फाऊंडेशनची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली असली तरी आशीष गोळे आणि त्यांचा मित्र परिवार गेली अनेक वर्षे बदलापूरमध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवीत आहे. गेली १३ वर्षे नवीन वर्षांच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात या मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. दिवसेंदिवस या रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. साधारण ५०० दाते या शिबिरात रक्तदान करतात. यंदाही किमान ५०० पिशव्या रक्त संकलित करण्याचा फाऊंडेशनचा संकल्प आहे. या फाऊंडेशनसाठी लागणारे बीजभांडवल गोळे कुटुंबीयांनी ‘इटस् टाइम टु गिव्ह’ या भावनेने उभे केले आहे. मात्र त्याची जाहीर वाच्यता ते कधीही करीत नाहीत. तुम्ही चांगल्या विचाराने एखादे काम हाती घेतले की त्याला तितकाच चांगला प्रतिसादही मिळतो, हा आशीष गोळे यांचा अनुभव आहे. बदलापूरमधील अनेक सुसंस्कृत आणि चांगल्या विचारांनी भारलेल्या मंडळींनी फाऊंडेशच्या कामात स्वत:हून आपले योगदान दिले आहे. अनेक मित्र त्यातून जोडले गेले आहेत. पॅथॉलॉजी लॅबची जबाबदारी श्रीराम मोहरीर सांभाळतात. फाऊंडेशनच्या दवाखान्याचे कामकाज डॉ. साधना देगांवकर पाहतात. विश्वास जोशी अॅक्युप्रेशर केंद्र पाहतात. श्रीराम केळकर, दीपाली केळकर आणि भूषण करंदीकर ‘प्रतिभावंत बदलापूरकर’ उपक्रमाचे संचालन करतात. आशीष गोळे यांच्या पत्नी आणि स्थानिक नगरसेविका तनुजा गोळे फाऊंडेशनच्या या सर्व उपक्रमात समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. केईएम रुग्णालय, जे.जे. महानगर आणि अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने फाऊंडेशनच्या वतीने दर वर्षी शंभर गरजूंना विनामूल्य रक्तपुरवठा केला जातो.
गेल्या रविवारी फाऊंडेशनने संकल्प फिजीओथेरेपी सेंटर सुरू केले. निरो फिजीओथेरेपीतज्ज्ञ भाग्यश्री मोकाशी या केंद्राचे कामकाज पाहणार आहेत. फाऊंडेशनने तब्बल ७०० चौरस फुटांच्या जागेत या उपचारासाठी लागणाऱ्या सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे बदलापूरकरांना या सुविधांसाठी आता अन्य शहरांमध्ये जावे लागणार नाही. अतिशय अल्पदरात गरजूंना ही सुविधा मिळणार आहे.
संपर्क- आशीष गोळे- ९८२२२०६५०७.
काका गोळे फाऊंडेशन, बदलापूर