नुकत्याच शाळा सुरूझाल्या आहेत. दिवसभर अभ्यासामागे असलेली मुले संध्याकाळी घरी आली की त्यांना भूक लागते. त्या वेळी त्यांना अगदी थोडे, परंतु काही तरी चटपटीत हवे असते. मात्र रोज रोज वेगळे आणि चविष्ट काय द्यायचे, असा प्रश्न गृहिणींना पडलेला असतो. त्यांना मुलांना या वेळी भाजीपोळी नको असते, कारण ती त्यांच्या दुपारच्या डब्यात असते. मुलांची ही संध्याकाळची छोटी भूक शमविणारे चमचमीत, परंतु तितकेच पौष्टिक पदार्थ डोंबिवलीतील सुरेश शेटे यांच्या ‘काकाजू फूड कॉर्नर’मध्ये मिळतात. त्यामुळे या परिसरातील शाळा सुटलेली मुले इथे काही वेळ रेंगाळून पोटपूजा करताना दिसतात. येथील ब्रेड रोल, चायनीज वडापाव या पदार्थाना विशेष मागणी आहे.
सकाळच्या वेळी पोहे, उपमा, शिरा हे पदार्थ मुले आवडीने खातात. मात्र संध्याकाळी त्यांना पॅटिस, सॅण्डविच, चायनीज असे पदार्थ हवे असतात. मात्र तिन्हीसांजेला हे पदार्थ खाल्ले की मुलांची रात्रीची भूक कमी होते. मग ते जेवायचा कंटाळा करतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी मुलांना नेमके काय द्यावे याचा नीट अभ्यास करून सुरेश आणि अश्विनी शेटे यांनी हे कॉर्नर सुरू केले. सुरेश शेटे यांनी सुरुवातीला हॉटेल व्यवसायात काही काळ नोकरी केल्याने त्या अनुभवाचा त्यांना या व्यवसायात उपयोग झाला. डोंबिवली पश्चिम विभागातील त्यांचे हे कॉर्नर चटपटीत आणि पौष्टिक पदार्थासाठी सध्या लोकप्रिय आहे. मुलांच्या पॉकेटमनीच्या खर्चात परवडतील अशा किफायतशीर दरात येथे पदार्थ उपलब्ध आहेत, हे विशेष. ब्रेड रोल हा तसा नेहमीचाच. मात्र इथे उकडलेल्या बटाटय़ाला थोडी वेगळी फोडणी दिली जाते.
ब्रेडमध्ये ते सारण भरून तळले की मस्त कुरकुरीत लागते. मिरची, कोथिंबीर, आले, लसूण यांना मोहरी, ओवा, हिंग यांची फोडणी देऊन हा मसाला बटाटाच्या भाजीत टाकला जातो. तसेच हे रोल नेहमीच्या टोमॅटो सॉसबरोबर न वाढता ते शेजवान चटणीसोबत एका प्लेटमध्ये वाढले जातात. दुसरा पदार्थ म्हणजे चायनीज वडापाव. या पदार्थालाही मुलांनी चांगली पसंती दिली आहे. कोबी, गाजर, बीट यांपासून मंच्युरियन बनवून त्यांना बटाटावडय़ाचा आकार देऊन ते तळले जातात. पावाला हिरवी, लाल मिरची सोबतच शेजवान चटणी लावून हा मंच्युरियन वडापाव ओव्हनमध्ये थोडा क्रिस्पी बनवून दिला जातो.
शेजवान चटणीचीही एक वेगळी खासियत आहे. इतर ठिकाणी मिळणाऱ्या शेजवान चटणीपेक्षा येथील चटणीला एक वेगळी तिखट, गोड अशी चव आहे. याविषयी अश्विनी सांगतात, आम्ही पूर्वी एका खासगी कॅटर्सकडून शेजवान चटणी घेत असू, परंतु एक दिवस त्यांची बनविण्याची पद्धत आम्ही पाहिली. त्यामध्ये खाण्याचे रंग व इतर काही रासायनिक पदार्थ मिसळलेले पाहून आम्ही त्यांच्याकडून चटणी घेणे बंद केले व घरीच चटणी तयार करण्याचे ठरविले. आम्ही चटणीमध्ये कोबी, गाजर, बीट, आले, लसूण, टोमॅटो प्युरी चायनीज सॉस टाकतो. बीटमुळे चटणीला नैसर्गिक लाल रंग येतो व टोमॅटो प्युरीमुळे चटणी पातळ होते. थोडी आंबट, गोड, तिखट अशा चवीची ही चटणी मुलांना विशेष पसंत आहे. तसेच मंच्युरियनमध्येही केवळ कोबी, मैदा यांचा वापर न करता त्यामध्येही गाजर, कोबी व बीट यांचा वापर करतो. त्यामुळे मंच्युरियनची एक वेगळी चव येथे मुलांना चाखायला मिळते.
महागाई वाढली तरी शेटे यांनी पदार्थाच्या भावात गेल्या तीन वर्षांत एकदाही भाववाढ केलेली नाही. त्यामुळे लहान मुलांसोबतच मोठी माणसेही येथून नाश्त्यासाठी ब्रेड रोल, मंच्युरियन घेऊन जातात. केवळ मुलांसाठी संध्याकाळी हा कॉर्नर डोंबिवलीत सुरू असतो. त्यामुळे येथे थोडासा नाश्ता केल्यानंतर मुले नक्कीच त्यांच्या छोटय़ा भुकेला टाटा करतात.
काकाजू फूड कॉर्नर
- कुठे? आनंद नगर, डॉन बॉस्को शाळेच्या मागे, डोंबिवली (प.)
- वेळ – संध्याकाळी ४ ते ७.३०