ठाणे महापालिकेच्या तिजोरीला लागलेल्या ग्रहणाचा फटका आता रसिकांना बसण्याची चिन्हे आहेत. गडकरी रंगायतन आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या नाटय़गृहांप्रमाणेच कळवा आणि वागळे इस्टेट परिसरात दोन नाटय़गृहे उभारण्याचा प्रस्ताव विद्यमान महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बासनात गुंडाळला आहे. ही नाटय़गृहे होणार, असे स्वप्न त्या त्या भागातील राजकीय नेते आपल्या मतदारांना दाखवत असले तरी प्रत्यक्षात नवीन वर्षांच्या अर्थसंकल्पात या दोन्ही नाटय़गृहांचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही.  
ठाणे शहरात अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गडकरी रंगायतनला पर्याय म्हणून तसेच पश्चिमेकडे वाढणाऱ्या घोडबंदर मार्गावरील लोकवस्तीसाठी ठाणे महापालिकेने डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाची उभारणी केली. या नाटय़गृहाच्या लोकार्पण होताच कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्यातही नाटय़गृह उभारण्याची मागणी लावून धरली. काँग्रेस आघाडीची सत्ता असताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाटय़ागृहाच्या उभारणीस मंजुरीही दिली. कळव्याच्या नाटय़गृहाच्या उभारणीचा निर्णय होताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीही वागळे इस्टेट परिसरासाठी एक नाटय़गृह उभारण्याच आग्रह धरला. सत्ताधाऱ्यांच्या आग्रहापुढे नमते घेत तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी हा प्रस्ताव पुढे रेटला.
मात्र, गुप्ता यांच्या जागी आलेले आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या दोन्ही नाटय़गृहांच्या प्रस्तावांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या दोन्ही नाटय़गृहांसाठी आगामी आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात अजिबात तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या वर्षभरात तरी नाटय़गृहांची कामे सुरू होणार नसल्याचे उघड आहे. यासंबंधी आयुक्त जयस्वाल यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
उत्पन्नापेक्षा तोटय़ाचे स्रोत
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या शहरांमधील नाटय़गृहांमध्ये नाटकांचे पुरेसे प्रयोग होत नसल्याची ओरड गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन या एकमेव नाटय़गृहाचा अपवाद वगळला तर ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीतील नाटय़गृहांमधील व्यवस्थापनांना जमा-खर्चाचे गणित सोडविताना नाकी नऊ येऊ लागले आहेत. अनेक ठिकाणी नाटय़प्रयोगांऐवजी खासगी संस्थांचे कार्यक्रम तसेच राजकीय मेळावेच अधिक होताना दिसतात. त्यामुळे ही नाटय़गृहे उत्पन्नापेक्षा तोटय़ाचे स्रोत बनत चालली आहेत.
जयेश सामंत, ठाणे

Story img Loader