ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीत असलेले राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय माजिवाडा भागात स्थलातरीत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या स्थलांतरणामुळे मोकळ्या होणाऱ्या रुग्णालयातील महाविद्यालयाच्या जागेवर रुग्ण उपचारासाठी खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यामुळे रुग्णालयाची क्षमता पाचशे खाटांवरून १ हजार खाटांपर्यंत वाढणार असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. येत्या काही महिन्यात हा प्रस्ताव मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेच्या कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुगणालय आहे. या रुग्णालयात ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेकडो गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. हे रुग्णालय पाचशे खाटांचे आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत हे रुग्णालय अपुरे पडू लागले आहे. रुग्ण उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना इतरत्र उपचारासाठी जावे लागत आहेत. तसेच या रुग्णालयाच्या कारभारावरून महापालिका गेल्या काही वर्षांपासून टीकेची धनी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयाचा कारभार सुधारण्याबरोबरच रुग्ण उपचाराची सुविधा वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभाग तयार करून त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याशिवाय, रुग्णालयात वाचनालयही सुरू करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ रुग्ण उपचारासाठी खाटांची संख्या वाढविण्यासाठी आयुक्त बांगर यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा – कल्याणमध्ये आधारवाडीत सफाई कामगारांच्या हजेरी निवाऱ्यात भाजीपाल्याचे बेकायदा दुकान
या रुग्णालयाच्या इमारतीत राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय दुसरीकडे स्थलांतरीत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. माजिवाडा येथे पालिकेच्या ५ मजली आणि १२ मजली अशा दोन इमारती आहेत. यामध्ये हे महाविद्यालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यापैकी एका इमारतीत पालिकेची वैद्यकीय प्रयोगशाळा आहे. या दोन्ही इमारतींमध्ये महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालय स्थलांतरीत करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यानंतर या स्थलांतरणामुळे मोकळ्या होणाऱ्या रुग्णालयातील महाविद्यालयाच्या जागेवर रुग्ण उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. रुग्ण उपचारासाठी सुमारे पाचशे खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहेत. महाविद्यालय स्थलांतरित करणे आणि रुग्णालयात खाटांची संख्या वाढविणे यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे काम पालिका प्रशासनामार्फत सुरू आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.
हेही वाचा – कल्याणमध्ये भटक्या गाईंची मोटारीच्या डिकीमधून तस्करी
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांनी कळवा रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्याबाबतची घोषणाही केली होती. या रुग्णालयातील रुग्णसेवा सुधारण्यासाठी रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या वाॅर्डमधील वापर क्षमता शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे, अशा वाॅर्डमध्ये खाटांची संख्या वाढविणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, हे नियोजित आहे. टप्प्याटप्प्याने रुग्णालयाची क्षमता पाचशे खाटांवरून १ हजार खाटांपर्यंत वाढविण्याचे नियोजित आहे, असे अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले होते. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केल्याचे चित्र आहे.