ठाणे : जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे, असे सांगत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु-शिष्याची नव्हे तर सत्य-असत्य, धर्म -अर्धमाची लढाई आहे. नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे, असे विधान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंब्रा येथील शमशाद नगरमधील सभेत बोलताना केले. जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवार नजीब मुल्ला याच्या प्रचारासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंब्रा येथील शमशादनगर येथे मंगळवारी रात्री जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले. यावेळी पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक राजन किणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्लापेक्षाही मोठे समजतात त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे. कळवा मुंब्र्याची ही लढाई गुरु शिष्याची लढाई नाही तर योग्य-अयोग्यची लढाई आहे. सत्य-असत्याची लढाई आहे, धर्म-अधर्माची लढाई आहे. यामुळेच नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन बनून आलो आहे, असे मुंडे यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड हा माणूस दुतोंडी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपबरोबर जाण्यासाठी पत्रकावर सही केली होती. सही करताना विधान परिषदेची मागणीही आव्हाड यांनी केली होती. परंतु नंतर अजित पवार यांच्या भितीने सही केली, अशी पलटी मारली, असा दावा ही त्यांनी केला.

हेही वाचा – डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई

टोरन्ट कंपनीकडून पैसा खाणाऱ्याला पराभूत करा, मग मीही टोरन्ट कंपनीला ठेवणार नाही असे वचन देतो. लाडक्या बहिणींना महायुती सरकारने प्रतिमहा १५०० मानधन सुरु केल्यावर त्याविरोधात बोलणाऱ्या महाविकास आघाडीने आता महिलांना तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. परंतु ज्या कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश येथून ही कल्पना आणली. तेथील निवडणुका संपल्यावर तीन हजार रुपये देण्याची योजना बंद झाली आहे. महाराष्ट्रतही माताभगिनींची महाविकास आघाडीकडून अशीच फसवणूक होवू शकते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – तहानलेल्या वस्त्यांमध्ये प्रचारतही पाणी मुद्द्याची टंचाई, जिल्ह्यातील इतर मतदार संघांमध्ये मात्र पाणीप्रश्नावरून राजकारण तापले

जितेंद्र आव्हाड म्हणतात मला निवडून द्या, मी महिन्याभरात टोरन्ट पाॅवर घालवतो. मंत्री, आमदार असताना टोरन्ट का घालवले नाहीत उलट टोरन्टला चार्ज देतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. मुंब्रा कळव्यातील मतदारांच्या मतांवर आमदार होऊनही थोड्याश्या पैशासाठी मतदारांचे पाकिट मारुन जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःचे घर भरले आहे. यामुळेच टोरन्ट पाॅवर हटविण्यासाठी विद्यमान आमदाराचा पराभव करून मला निवडून द्या, असे विधान उमेदवार नजीब मुल्ला यांनी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalwa mumbra constituency agriculture minister dhananjay munde mumbra sabha dharma adharma vidhan ssb