ठाणे : ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन खाडी पुलावरील एक मार्गिका तसेच मुंब्रा वाय जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पणास आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची चिन्हे आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पुलाची छायाचित्रफित प्रसारित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे खारेगाव उड्डाणपुलाप्रमाणेच या दोन्ही पुलांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभुराज देसाई, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आमदार, खासदार, अधिकारी आणि नागरिक उपस्थित असणार आहेत. ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडणारा ब्रिटिशकालीन खाडीपूल वाहतुकीसाठी बंद केल्याने दुसऱ्या खाडी पुलावरन सद्य:स्थितीत वाहतूक सुरू आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडू लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिकेने तिसरा खाडी पूल उभारणीचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास आले आहे. विटावा ते ठाणे पोलिस मुखालय अशा एका मार्गिकेचे काम पुर्ण झाले असून ही मार्गिका वाहतूकीसाठी खुली करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तशाप्रकारची मागणी केली होती. नवरात्रौत्सवाच्या काळात ही मार्गिका खुली करण्याची तयारी सुरु झाली होती. मात्र, तोही मुहूर्त टळला. त्यामुळे ही मार्गिका केव्हा खुली होणार अशी विचारणा नागरिकांकडून केली जात असतानाच, ही मार्गिका खुली करण्यासाठी अखेर आजचा मुहूर्त सापडला आहे.

हेही वाचा : ठाणे पोलीस दलातील बहुचर्चित बदल्या अखेर पूर्ण; ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तपदी शिवराज पाटील

कळवा पुलावरील एका मार्गिकेचे लोकार्पण आज दुपारी ४ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळे ठाणे आणि कळवा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले असून या पुलाचे लोकार्पण करण्याचीही मागणी होत होती. या पुलाचेही लोकार्पण आज दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार असून यामुळे मुंब्रा वाय जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : विश्लेषण: केंद्रानं केला भारतातील ५७६ मातृभाषांचा सर्व्हे; काय आहेत निष्कर्ष? वाचा सविस्तर!

स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा पुलाची छायाचित्रफित प्रसारित करत या पुलासाठी आपलेच योगदान असल्याचा दावा करत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी खारेगांव उड्डाणपुलाच्या उदघाट्नच्या वेळीही जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली होती. त्यामुळे लोकार्पण कार्यक्रमादरम्यान कळवा पूल आणि मुंब्रा वाय जंक्शन उड्डाणपुलाच्या श्रेयवादाची लढाई पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalwa new creek bridge and mumbra y junction flyover inaugurated by chief minister today jitendra vhad video thane tmb 01