ठाणे : तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या कळवा खाडीवरील नवीन खाडी पुलाचे अखेर पुर्ण झाले असून हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी ठाण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान, नवरात्रौत्सवाच्या काळात नवीन खाडी पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असून यामुळे या खाडी पुलाचा नवरात्रौत्सवाच्या काळात शुभारंभ होण्याबरोबरच येथील नागरिकांची कोंडीतून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी दोन खाडी पुल आहेत. त्यापैकी ब्रिटीशकालीन पुल धोकादायक झाल्याने तो काही वर्षांपुर्वीच वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. दुसऱ्या पुलावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी होत आहे.

ही कोंडी कमी करण्यासाठी तिसरा खाडी पुल उभारण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ मध्ये या पुलाच्या कामाची मुदत होती. या मुदतीत काम पुर्ण होऊ शकले नव्हते. त्यानंतर करोना काळात मजुर गावी निघून गेल्यामुळे पुलाचे काम काही महिने ठप्प झाले होते. या पुलावरील एका मार्गिकेचे काम ऑगस्ट महिनाअखेर पुर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने ठेकेदाराला दिले होते. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरी या पुलाचे काम पुर्ण झालेले नसल्यामुळे तो वाहतूकीसाठी खुला होऊ शकला नव्हता.

हेही वाचा : करोनात अनाथ झालेल्या मुलांचे शालेय शुल्क माफ करण्याचे खासगी शाळांना बालहक्क आयोगाचे आदेश

तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आलेल्या या पुलाचे काम अखेर पुर्ण झाले असून हा पुल वाहतूकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पुलाचे काम पुर्ण झालेले असल्यामुळे तो वाहतूकीसाठी खुला करावा अशी मागणी आव्हाड यांनी केली. त्यावर नवरात्रौत्सवाच्या काळात नवीन खाडी पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानक भागात सॅटिस प्रकल्प राबवा ; शिवसेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

कळवा खाडी पुलाचे काम पुर्ण झालेले असल्यामुळे नागरिकांकडून हा पुल खुला करण्याची मागणी होत असून त्याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी नवरात्रौत्सवाच्या काळात नवीन खाडी पुल वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. हा पुल वाहतूकीसाठी खुला झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. – जितेंद्र आव्हाड ,राष्ट्रवादी नेते

Story img Loader