ठाणे : ठाणे महापालिकेने दहा वर्षांपुर्वी आखलेल्या कळव्यातील नाट्यगृह प्रकल्प काही वर्षांपुर्वी गुंडाळण्यात आला असतानाच, आता हाच प्रकल्प पुन्हा मार्गी लावण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सविस्तर आराखडा करण्याचे आदेश खासदार श्रीकांत शिंदे यांचे पालिकेला बुधवारी झालेल्या बैठकीत दिले असून यानिमित्ताने कळव्यात पुन्हा नाट्यगृहाची टूम सुरू झाल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील राम गणेश गडकरी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या दोन नाटय़गृहांसोबत आता कळव्यात नवे नाट्यगृह उभारणीचा निर्णय ठाणे महापालिकेने दहा वर्षांपुर्वी घेतला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीचे त्यावेळी राज्यात सरकार होते आणि त्या काळात कळवा-मुंब्य्रातील विकास कामांसाठी भरघोस निधी देण्यात आला होता. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड हे आग्रही होते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात नाट्यगृह उभारणीचा निर्णय झाला होता. त्यांनी नाट्यगृहाच्या उभारणीसाठी कळव्यात मैदानासाठी आरक्षित असलेल्या सुमारे १४ हजार चौरस मीटरच्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास राज्याच्या नगर विकास विभागाने हिरवा कंदील दाखविला होता. यामुळे मैदानाच्या जागेवर आता नाटय़गृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. आयुक्त राजीव यांनी अर्थसंकल्पामध्ये नाट्यगृह उभारणीची घोषणा करून त्यासाठी तरतूदही केली होती. पुढे दोन ते तीन वर्ष सादर झालेल्या अर्थसंकल्पात नाट्यगृहाचा उल्लेख होता. मात्र, त्यानंतरच्या अर्थसंकल्पात नाट्यगृह प्रकल्पाला स्थान देण्यात आले नव्हते. एकूणच हा प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे चित्र होते.

कळव्यातील नाट्यगृह उभारणीसाठी पालिकेने पुन्हा हालचाली सुरू केल्या असून या नाट्यगृह उभारणीबाबत बुधवारी पालिका मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली. ठाणे महापालिकेत बुधवारी कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेंक्शन सेंटर, कोलशेत येथील टाऊन पार्क, कळव्यातील यशवंत रामा साळवी तरण तलावाची नव्याने बांधणी यासह खारेगाव येथील प्रस्तावित नवीन नाट्यगृह प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यानिमित्ताने कळव्यात पुन्हा नाट्यगृहाची टूम सुरू झाल्याचे चित्र आहे.

खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्याने नाट्यगृह इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्याचबरोबर, मोठे नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोटेखानी ३०० ते ३५० प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल, अशी सूचना खासदार म्हस्के यांनी केली.