कल्याण : कल्याणमधील एका २१ वर्षाच्या केश सजावटकार (हेअर ड्रेसर) महिलेला तिच्या जुन्या मित्राने आपल्याला मित्राच्या वाढदिवसाला जायचे आहे, असे सांगून तिला कल्याण पूर्वेतील एका लॉजवर नेले. तेथे तिच्या मनाविरूध्द लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला लॉजमधील खोलीत डांबून ठेऊन पळून गेलेल्या एका ३० वर्षाच्या तरूणा विरुध्द महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
रणविजय माधव सिंग (३०, रा. कालीमाता मंदिराजवळ, उतेकर चौक, नूतन शाळेजवळ, कल्याण पूर्व) असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला कल्याणमध्ये केश सजावटकार म्हणून काम करते. मंगळवार ते बुधवार या दोन दिवसांच्या कालावधीत रात्रीच्या वेळेत कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी मधील श्री लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा…ठाणे : खड्ड्यामुळे तरुणाचा मृत्यू, मागून येणाऱ्या भरधाव मोटारीची धडक; शिळफाटा भागातील घटना
पोलिसांनी सांगितले, पीडित केश सजावटकार महिला आणि आरोपी तरूण हे पूर्वीचे एकमेकांचे मित्र आहेत. पीडिता या तरूणाला त्यामुळे ओळखत होती. मंगळवारी सकाळी आरोपी रणविजय सिंग याने पीडितेला आपल्या एका मित्राचा वाढदिवस आहे. त्यासाठी आपणास त्या वाढदिवस मेजवानीसाठी कल्याण पूर्वेत कोळसेवाडीत जायचे आहे असे खोटे सांगितले. रणविजयच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पीडिता रणविजय बरोबर कल्याण पूर्वेत गेली. आरोपीने पीडितेला कोळसेवाडी मधील श्री लॉजमध्ये नेले. येथेच वाढदिवस साजरा होणार आहे, असे पीडितेला खोटे सांगितले.
हेही वाचा…उल्हास नदीचे पाणी ओसरले, महामार्ग उखडला; बदलापुरात पाणी पातळी १४.७० मीटरवर
काही वेळाने रणविजयने पीडितेला दमदाटी करून ‘तु माझ्या जीवनात येणार नसशील तर मी तुला कोणाचीही होऊन देणार नाही. तू परत मा्झ्याशी स्नेहसंबंध ठेव,’ असे बोलून पीडितेला बेदम मारहाण करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेवर तिच्या मनाविरुध्द जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तिला लॉजच्या खोलीत डांबून ठेऊन बाहेरून कुलूप लावून तेथून पसार झाला. लॉज चालकाला हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी लॉजची खोली उघडली. त्यावेळी पीडिता आतमध्ये असल्याचे समजले. पीडितेने रणविजय विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.