कल्याण : कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस एका आरोपीला पोलीस वाहनातून घेऊन आधारवाडी कारागृहाच्या दिशेने शनिवारी जात होते. पोलीस वाहन कल्याण पश्चिमेतील वायले चौकात आले होते. तेथे काही कामानिमित्त पोलीस आरोपीसह थांबले असताना, आरोपीने पोलिसांच्या हाताला जोराचा झटका देऊन वाहनातून उडी मारून पळ काढला. या पळालेल्या आरोपीला उल्हासनगरच्या गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी उल्हासनगरमधील अमन चौकातून अटक केली आहे.
संजू किसन वाघेरी (२२) असे आरोपीचे नाव आहे. एका प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तो न्यायबंदी आहे. शनिवारी विठ्ठलवाडी पोलिसांचे एक पथक संजू किसन वाघेरी यांंना घेऊन कल्याण पश्चिमेतील वायलेनगर, निकीनगर खडकपाडा भागातून पोलीस वाहनातून चालले होते. निकीनगर, वायलेनगर भागात काही कामानिमित्त पोलीस आरोपीसह थांबले. आरोपी संजू वाघेरी यांनी आजुबाजुच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. या भागात इमारतींची बांधकामे, झाडेझुडपे, रान गवत अधिक प्रमाणात आहे. ही जागा आपणास पळून जाण्यासाठी योग्य आहे असा विचार करून संजू वाघेरी यांनी ज्या पोलिसाने त्यांना अटकाव लावून पकडून ठेवले होते. त्या पोलिसाच्या हाताला जोराचा झटका दिला. काही कळण्याच्या आत संजू वाघेरी यांना परिसरातील इमारत बांधकाम, परिसरातील झुडपांच्या दिशेने पळ काढला.
हेही वाचा…डोंबिवलीत सुभाष रस्त्यावर झाड कोसळुन दुचाकींचा चुराडा
पोलीस वाहनातील पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग केला. या भागातील काही पादचारी तरूणांनी पळालेल्या आरोपीचा पाठलाग केला. परंतु, हाताचे अटकाव सोडवत आरोपी झुडपांचा आधार घेत पळून गेला. तरूणांनी झुडपांमध्ये जाऊन त्याचा शोध घेतला. तो पसार झाला होता. विठ्ठलवाडी, खडकपाडा पोलीस यांनी वायलेनगर, वर्टेक्स काॅम्पलेक्स भागात शोध मोहीम राबवली. ही माहिती तात्काळ उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी वर्टेक्स गृहसंकुल भागात शोध मोहीम राबवली. तो आढळून आला नाही.
आरोपी उल्हासनगरमध्ये पळून जाण्याचा अंदाज घेऊन उल्हासनगर गु्न्हे शोध पथकाचे हवालदार मिसाळ, चव्हाण, राठोड, गायकवाड, डमाळे यांनी उल्हासनगर शहरात शोध मोहीम राबवली. ही मोहीम राबवत असताना उल्हासनगरमधील अमन सिनेमागृहाजवळील कैलासधाम इमारतीजवळ भीमनगर, ओटी सेक्शन, राहुलनगर, उल्हासनगर-४ येथे संजू वाघेरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना तातडीने खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात वैद्यकीय तपासणीकरता देण्यात आले.