ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते शैलेश निमसे यांच्या पत्नी वैशाली निमसे यांनी कल्याणच्या आधारवाडी कारागृहात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैशाली निमसेने आधारवाडी कारागृहातील शौचालयात नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. गळफास घेवून मृत्यू झाल्याने ही आत्महत्या आहे की आणखी दुसरे काही यासंबंधी पोलीस तपास करीत आहेत.
काय आहे प्रकरण –
एप्रिल 2018 मध्ये शहापुरचे शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी वैशालीसह अन्य दोघांना अटक केली होती. शैलेशचे एका महिलेसह अनैतिक संबंध होते. यावरुन दोघांमध्ये वारंवार भाडणं होत होती. अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत लग्न करण्याचा निर्णय शैलेश यांनी घेतला होता. तसेच वैशालीला मारहाण करून तिच्या नावे असलेली मालमत्ताही आपल्या नावे करून घेतली होती. या रागातूनच वैशाली हिने निमसे यांच्या हत्येची दीड लाखांची सुपारी दिली होती. वैशाली हिने महिनाभर आधी शैलेश यांच्या हत्येचा कट रचला होता. घटनेच्या दिवशी वैशालीने घराचा आणि बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवला होता. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस एका दुचाकीवरून तिच्या साथीदारांनी घरात प्रवेश करून त्यांनी दोरीने गळा आवळून शैलेश यांची हत्या केली होती. हत्येनंतर शैलेश यांच्या कारच्या डिकीमध्ये त्यांचा मृतदेह टाकून तो भिवंडीतील देवचोळे गावातील जंगलात नेऊन जाळला होता.