कल्याण : कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागात एक इसम मेफोड्रिन (एमडी) पावडरची तस्करी करत आहे, याची माहिती पोलीस उपायुक्तांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या पथकाने सापळा लावून बैलबाजार भागातून लाखो रूपये किमतीची सात ग्रॅम वजनाची एमडी पावडर पोलीस पथकाने जप्त केली आणि या पावडरची तस्करी करणाऱ्या इसमाला अटक केली.
माताफ अनिस रईस (३३, रा. जुने मच्छी मार्केट, गोल्ड प्लाझा इमारत, कल्याण पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. गेल्या चार महिन्यात कल्याण पश्चिमेतील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, बाजारपेठ विभाग, बैलबाजार भागातून गांजा, एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. सततची कारवाई करूनही अंमली पदार्थांचे तस्कर तस्करी थांबवत नसल्याने पोलीस हैराण आहेत.
महात्मा फुल पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोध पथक गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बैलबाजार चौकात एक इसम संशयास्पदरित्या आढळून आला. या भागात अंमली पदार्थांची चोरून तस्करी होत असते याची जाणीव पथकाला होती. त्यामुळे त्यांनी संशयास्पदरित्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यांच्या अंगझडतीत पथकाला प्रतिबंधित एमडी पावडर आढळून आली. आपणास खबर मिळालेला इसम हाच तो आहे याची खात्री पटल्यावर पथकाने त्याला अटक केली. त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या इसमाने ही एमडी पावडर कोठुन आणली. तो ती कोणाला विक्री करणार होता. तो हा तस्करीचा व्यवसाय कधीपासून करतो या दिशेने पोलीस पथक तपास करत आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कल्याण, डोंबिवली शहराच्या भागात सतत गस्त असल्याने यापूर्वीच गांजा, एमडी पावडर तस्करीचे बहुतांशी अड्डे बंद पडले आहेत. कल्याण, डोंबिवली नशामुक्त करण्याचे जोरदार अभियान पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शहरात सुरू केले आहे. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत.