कल्याण : टिटवाळ्यातील बल्याणी टेकडी बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जात होते. सरकारी, वन विभागाच्या, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर या भागात बांधकामधारकांनी बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या भागातील नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व बेकायदा चाळी भुईसपाट करण्याची तीन दिवसांची मोहीम अ प्रभागाचे नवनियुक्त साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बेकायदा चाळी तोडण्यापूर्वी या बेकायदा चाळींना मुख्य जलवाहिनींवरून घेतलेला पाणी पुरवठा खंडित केला जात आहे. बेकायदा चाळी तोडताना पालिकेचे प्लम्बर सोबत ठेवण्यात आले आहेत. बल्याणी टेकडी भागात पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी मागील दहा वर्षाच्या काळात बांधकामधारकांनी उभारल्या आहेत. यामध्ये काही स्थानिक नागरिक, काही राजकीय मंडळींचा सहभाग असल्याच्या तक्रारी आहेत.

मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसात बल्याणी टेकडीवरील नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व बेकायदा चाळी तोडण्यात येणार आहेत. या भागात एकही नवीन बेकायदा उभे राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले. टिटवाळा, मांडा, बल्याणी टेकडी परिसरातील बेकायदा बांधकामांच्या वाढत्या तक्रारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांच्याकडे येत होत्या. या बांधकामांवर यापूर्वीच्या अधिकाऱ्यांकडून आक्रमकपणे कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे आयुक्त अ प्रभागात नवीन साहाय्यक आयुक्त नेमण्याच्या प्रयत्नात होत्या. अधीक्षक प्रमोद पाटील ही जबाबदारी योग्यरितीने पार पाडतील याची माहिती मिळाल्यानंतर आयुक्त डाॅ. जाखड यांनी अ प्रभाग प्रभाग साहाय्यक आयुक्तपदी प्रमोद पाटील यांची नियुक्ती केली आहे.

पदभार स्वीकारल्यापासून साहाय्यक आयुक्त पाटील यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्या आदेशावरून टिटवाळा, मांडा, बल्याणी टेकडी परिसरातील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द जोरदार तोडकाम मोहीम सुरू केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. बांधकामधारकांमध्ये मात्र या तोडकाम मोहिमेमुळे घबराट पसरली आहे. बांधकामधारकांचे लाखो रूपयांची गुंतवणूक कारवाईमुळे मातीमोल होत आहे. या बेकायदा चाळींमुळे नैसर्गिक नाले, प्रवाह बंद केले जात असल्याने टिटवाळा परिसर पावसाळ्यात जलमय होत होता.

टिटवाळ्यातील बल्याणी टेकडी भागात सर्वाधिक बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या चाळींच्या उभारणीतून या भागातील नैसर्गिक नाले, पावसाळी प्रवाह बंद केले जात आहेत. पावसाळ्यात या भागात जलमय परिस्थिती होत होती. पाणी चोरीचे प्रमाण या भागात अधिक होते. बल्याणी टेकडी भागातील सर्व बेकायदा चाळी येत्या तीन दिवसांच्या तोडकाम कारवाईत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्या आदेशावरून भुईसपाट केल्या जाणार आहेत. प्रमोद पाटील साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.