कल्याण – कल्याण पूर्वेतील भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्यावर गोळीबार केल्यानंतर वर्ष होत आले तरी अद्याप तीन मारेकऱ्यांना पोलीस पकडू शकले नाहीत. हे तीन फरार मारेकरी पोलिसांना शोधून देणाऱ्यास आपण स्वता २५ हजार रूपयांचे बक्षिस संबंधितांना देऊ, असे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकारांसमोर जाहीर केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी २ फेब्रुवारी रोजी आपल्यावर भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला. सहा गोळ्यांमध्ये आपण गंभीर जखमी झालो. याप्रकरणात एकूण सात जणांवर महेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह इतर सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामधील चार जण पोलिसांनी यापूर्वीच अटक केले आहेत.

याप्रकरणात अद्याप तीन जण फरार आहेत. हे तिन्ही फरार मारेकरी जे नागरिक पोलिसांना शोधून, पकडून देतील त्यांना आपण २५ हजार रूपयांचे बक्षिस देऊ, असे महेश गायकवाड यांनी जाहीर केले आहे. याप्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाड तळोजा कारागृहात आहेत. तीन जण अद्याप पकडले गेले नसताना याप्रकरणातील अटक मारेकऱ्यांना एक एक करून जामीन मंजूर करून घेण्याची शृखंला सुरू आहे. फरारी आरोपींना अशाच पध्दतीने जामीन मंजूर होण्याची शक्यता माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा : कल्याणमध्ये चिंचपाडा येथे मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना नागरिकांचा चोप

मागील वर्षी दावडी येथील एका जमीन प्रकरणातून महेश गायकवाड आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यात वाद झाला. हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गट हिललाईन पोलीस ठाण्यात एकत्र आले होते. दोन्ही गटाचे समर्थक यावेळी अधिक संख्येने हिल लाईन पोलीस ठाण्याबरोबर जमले होते. दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी हमरीतुमरी सुरू होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात अगोदर माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक बसले होते. त्यानंतर एक उत्सवी कार्यक्रम आटोपून गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात समर्थकांसह हजर झाले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याबाहेरील जमावाला शांत करण्यात व्यस्त असताना पोलीस ठाण्यातील दालनात अचानक माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कमरेचे पिस्तुल काढून त्यामधून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सहा गोळ्या झा़डल्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता. त्याप्रमाणे त्यांच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणात महेश यांच्या तक्रारीवरून एकूण सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यामधील तीन जण अद्याप फरार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan bjp former mla ganpat gaikwad firing case mahesh gaikwad announced reward of rupees 25000 to search accused css