कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांना कॉक्रिटचा मुलामा चढविण्याच्या कामाची गेल्या तीन वर्षांपासून रडकथा सुरू आहेत. ही कामे वेगाने पूर्ण व्हावी यासाठी नेमण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन कंपनीने महिनाभरापासून काम बंद केल्याने आधीच मंदगती सुरू असलेली रस्त्यांची कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कामांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सल्लागार कंपनीच्या कामगिरीविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीका केली होती. या पाश्र्वभूमीवर या कंपनीने काम थांबविल्याने रस्त्याची कामे रखडण्याची चिन्हे आहेत.
तत्कालीन महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी सर्वसाधारण सभेत याप्रकरणी उत्तर देताना सिमेंट रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखला जात नसल्याची कबुली दिली होती. डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत मोनार्च कंपनीवर टीका झाल्यानंतर जानेवारी महिन्यातील पहिल्याच तारखेला कंपनीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम थांबवल्याचे महापालिकेला कळवले आहे.
दरम्यान, नवीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीच्या हालचाली सुरू आहेत. तोपर्यंत सिमेंट रस्त्यांच्या कामास विलंब होणार आहे, असे शहर अभियंता पाटीलबुवा उगले आणि प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी रस्ते कामांच्या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader