लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण- मागील काही दिवसांपासून कल्याण शहरातील सर्व वर्दळीचे रस्ते वाहन कोंडीच्या विळख्यात अडकत आहेत. शिवाजी चौकातून वाहनासह बाहेर पडताना अनेक वेळा पाऊण तास रखडपट्टी करावी लागत आहे. या सगळ्या प्रकाराने प्रवासी हैराण आहेत.

शिवाजी चौक हा कोंडीचा मुख्य केंद्रबिंदू झाला आहे. याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याच्या कोणत्याच उपाययोजना नसल्याने पालिका, वाहतूक पोलीस प्रशासन हतबल आहे. शिवाजी चौकातून भिवंडी, शिळफाटा दिशेने येजा करणारी वाहने धावतात. पारनाका, बाजारपेठ भागातून येऊन मुरबाड रस्ता, पत्रीपुलाकडे जाणारी वाहने एकाचवेळी शिवाजी चौकात येतात. त्याचवेळी कल्याण रेल्वे स्थानकाकडून खडकपाडा, काळा तलाव, लालचौकी, आधारवाडी भागात जाणारी वाहने पुष्पराज हॉटेल महमद अली रस्त्यावरून शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जातात. एकावेळी ही वाहने आडवीतिडवी शिवाजी चौकात घुसत असल्याने वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक होत आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत गुप्ते रस्ता अडवून भूमिपूजन कार्यक्रमाचा मंडप

दिवाळीनिमित्त भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण भागातील नागरिक मोठी बाजारपेठ म्हणून कल्याणमध्ये खरेदीसाठी वाहनासह येतो. ही वाहने रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांची अशा वाहनांवर कारवाई करताना दमछाक होत आहे. शिवाजी चौकात दोन वाहतूक सेवक, दोन वाहतूक पोलीस असतात. या कर्मचाऱ्यांना चौकातील वाहतुकीचे नियोजन करणे अवघड होत आहे. या चौकात चार वाहतूक पोलीस, दोन वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.

शिवाजी चौकातील कोंडीतून मुक्तता झाली की मात्र बाजारपेठ, सहजानंद चौकातून वाहने सुसाट पुढील प्रवासासाठी निघतात. शिवाजी चौकातील कोंडीमुळे शंकरराव चौक, पारनाका भागाकडे जाणारे रस्ते कोंडीत अडकतात.मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. पालिका मुख्यालयांसमोरील रस्ते कोंडीत अडकत असल्याने पालिका कर्मचारी, अधिकारी वर्गाला त्याचे चटके बसत आहेत.

आणखी वाचा-ठाणे : उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आव्हाडांची बॅनरबाजी

एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, दिवाळीच्या सणामुळे रस्ते, पदपथ अडवून विक्रेते बसत आहेत. कल्याण शहराच्या विविध भागातून नागरिक खरेदीसाठी येत आहेत. त्यांची वाहने वाहनतळा अभावी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली जातात. शिवाजी चौकात वाहतूक पोलीस, सेवक तैनात असतात. या चौकाच्या रूंदीकरणाच्या तुलनेत वाहनांचे प्रमाण पाच पट असल्याने या भागात कोंडी होत आहे. शिवाजी चौकातील कोंडीमुळे पादचाऱ्यांना या कोंडीतून मार्ग काढत जावे लागते. या कोंडीचा फटका मुरबाड रस्ता भागाला बसत आहे.

पालिकेला विक्रेत्यांचा वेढा

कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त बसत असलेल्या मुख्यालयाला विक्रेत्यांचा विळखा पडला आहे. मुख्यालयालगतचे पदपथ महिला बचत गटांचे फराळाचे स्टॉल यांनी व्यापून टाकले आहेत. मुख्यालयाच्या बाहेर दुचाकी, चारचाकी वाहने मुख्य रस्त्यात उभी केली जात आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. मुख्यालयाबाहेर कोंडी होत असताना पालिकेकडून या विक्रेत्यांवर कारवाई केली जात नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. १५ वर्षापूर्वी पालिकेने शिवाजी चौकात भुयारी मार्ग प्रस्तावित केले होते. परंतु, निधीची चणचण आणि राजकीय इच्छाशक्ती अभावी ही कामे रखडली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan city is in chaos the vendors are in rush to the municipal headquarters mrj
Show comments