कल्याण – येथील खडकपाडा भागात शुक्रवारी दुपारी घरगुती सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटात कल्याण शहर मनसेच्या महिला अध्यक्षा शितल विखणकर या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नवी मुंबई नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या ८० टक्के भाजल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
कल्याण शहर मनसेच्या अध्यक्षा शितल विखणकर या खडकपाडा भागात राहतात. शुक्रवारी दुपारी त्या घरात स्वयंपाक करत होत्या. यावेळी सिलेंडर टाकीचा स्फोट झाला. या स्फोटात त्या गंभीररित्या भाजल्या. सिलेंडर टाकीचा स्फोट झाल्याने सोसायटीतील नागरिकांनी तातडीने विखणकर यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांना तातडीने भिवंडी कोन येथील वेद रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना नवी मुंबईतील बर्न रुग्णालयात नेण्यात आले.
हेही वाचा – ठाणे : शाळा, महाविद्यालयांमध्ये महोत्सवाची धूम, विद्यार्थी-शिक्षक आयोजनात व्यस्त
अग्निशमन दल, पोलीस, गॅस पुरवठादारांना तातडीने घटनास्थळी बोलविण्यात आले. त्यांनी सिलेंडरचा रेग्युलटर आणि बाहेर पडणारा गॅस रोखण्याची पहिली प्रक्रिया केली. सिलेंडरचा रेग्युलटर टाकीला बसविताना तो घट्ट बसविला नसावा. त्यामुळे गॅस सुरू करताना गळती झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.