कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागात सफाई कामगार म्हणून भरती होऊन नंतर रस्त्यावर झाडू मारण्याचे काम करावे लागू नये म्हणून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या दबावाने पालिकेच्या विविध विभागात, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या दालनात शिपाई म्हणून अनेक वर्ष सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना आपल्या मूळ नियुक्तीच्या सफाई कामगार विभागात हजर होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिले आहेत.
जे सफाई कामगार घनकचरा विभागात हजर होण्यास टाळाटाळ करतील, हलगर्जीपणा किंवा दबाव आणून मूळ विभागात जाण्यास टाळाटाळ करतील अशा कामगारांचे वेतन रोखण्यात येईल. अशा सफाई कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपायुक्त दिवे यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेत सफाई कामगारांची एकूण दोन हजार २७४ पदे मंजूर आहेत. यामधील दोन हजार ३५ पदे प्रशासनाने भरली आहेत. खासगी ठेकेदाराचे सुमारे ५०० हून अधिक कामगार कार्यरत आहेत. दोन हजार ५०० हून अधिक सफाई कामगार शहरात कार्यरत असताना शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. वेळेवर कचरा उचला जात नसल्याच्या तक्रारी घनकचरा विभागाकडे वाढल्या आहेत.
आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी शहराच्या विविध भागात भेटी दिल्या, त्यावेळी त्यांना अनेक भागात रस्त्यावर कचरा पडला असल्याचे आढळले. या हलगर्जीपणा बद्दल आयुक्तांनी क प्रभागातील दोन आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. कडोंमपातील कचरा मुख्य समस्या असल्याने ती संपुष्टात आणण्यासाठी आयुक्तांनी पावले टाकली आहेत. या कार्यवाहीचा भाग म्हणून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन सफाई कामगार म्हणून नियुक्त झालेले, पण प्रशासनाच्या सोयीसाठी विविध विभागांमध्ये शिपाई, लेखनिक पदावर काम करणाऱ्या सफाई कामगारांना पुन्हा घनकचरा विभागात मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्याची मागणी केली.
उपायुक्त दिवे यांनी तातडीने मुख्यालयातील विविध विभागात, प्रभागांमध्ये कार्यरत सफाई कामगारांनी तातडीने घनकचरा विभागात हजर व्हावे असे आदेश काढले. या आदेशामुळे सफाई कामगार म्हणून भरती होऊन रस्त्यावर झाडू मारायला नको म्हणून अनेक सफाई कामगार अनेक वर्ष पालिका पदाधिकारी, नगरसेवकांच्या आशीर्वादाने पालिका मुख्यालयातील विविध विभाग, प्रभागात कार्यरत आहेत. दोन वर्ष नगरसेवक, पदाधिकारी नसले तरी बहुतांशी सफाई कामगार पदाधिकाऱ्यांच्या दालनात, घरी सेवा देत होते.
माजी आयुक्त ई. रवीद्रन, पी. वेलरासू, माजी उपायुक्त डाॅ. रामदास कोकरे यांच्या कार्यकाळात ऐषआरामी सफाई कामगारांना विविध विभागातून बाहेर काढून रस्त्यावर सफाईसाठी उतरविले होते. या अधिकाऱ्यांच्या बदल्या हो्त्याच पुन्हा हे सफाई कामगार आपल्या जागी गेले होते.इतर संवर्गातील मूळ नियुक्ती सोडून अन्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ विभागात नियुक्त पदावर हजर होण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत.
फ प्रभागाकडे लक्ष
फ प्रभागात अनेक वर्ष अरुण जगताप हा सफाई कामगार फेरीवाला हटाव पथकाचे काम करतो. या कामगाराला डोंबिवलीतील एका माजी नगरसेवकाचा आशीर्वाद आहे. त्याची फ प्रभागातून कधीही बदली केली जात नाही. गेल्या वर्षी अशा कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाने मागविली होती. फ प्रभागाचे माजी साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी अरुण जगताप यांचे नाव वगळून इतर कामगारांची नावे मुख्यालयाला कळविली होती. प्रभागातील सर्व सफाई कामगारांची नावे मुख्यालयाला कळविणार आहोत, असे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी सांगितले.
शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम घनकचरा विभागाकडून राबविले जात आहेत. धूर, जंतूनाशक फवारणीचे काम प्रभागांमध्ये सुरू आहेत. या कामासाठी मनुष्यबळाची गरज घनकचरा विभागाला आहे. विविध विभागात सोयीप्रमाणे सेवा देणारे सफाई कामगार घनकचरा विभागात मागवून घेतले आहेत. – अतुल पाटील , उपायुक्त ,घनकचरा विभाग