कल्याण : येथील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी हिला शनिवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत (१४ दिवस) न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी विशालसह पत्नीला आणखी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणाचा बहुतांशी तपास पूर्ण झाला असल्याने न्यायालयाने दोघांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती याप्रकरणातील विशाल गवळीचे वकील ॲड. संजय धनके यांनी माध्यमांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली. शनिवारी सकाळी त्यांना पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने पीडीत कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार, ॲड. संजय मिश्रा आणि मारेकरी विशालचे वकील ॲड. संजय धनके यांचे म्हणणे एकून घेतले. पोलिसांनी विशालसह पत्नी साक्षी यांना तपास कामासाठी आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली होती.

हेही वाचा…अंबरनाथमध्ये जीवघेण्या खांबामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू, कल्याण बदलापूर राज्यमार्गावर गेल्या आठवड्यात झालेला अपघात

मोबाईलची विक्री लाॅजमध्ये

पीडीत कुटुंबीयांचे वकील ॲड. नीरज कुमार यांनी माध्यमांना सांगितले, मारेकरी विशाल गवळी हा पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहे. त्याची पोलीस कोठडीची मुदत वाढविण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशालने सुरूवातीला पोलिसांना आपण मोबाईल कसारा घाटात फेकून दिला असल्याची माहिती दिली होती. नंतर त्याने तो मोबाईल बुलढाणा शेगाव येथील एका लाॅज मालकाला पाच हजार रूपयांमध्ये विकला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित लाॅज मालकाशी संंपर्क साधला आहे. मालकाने मोबाईलसह सीमकार्ड पोलिसांना देण्याची तयारी दर्शवली. या मोबाईलच्या माध्यमातून विशालने ही हत्या करताना आणखी कोणाला संपर्क केला होता याचा तपास पोलीस करतील. गुन्ह्यातील होंडा शाईन दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

विशालचे वकील ॲड. संजय धनके यांनी माध्यमांना सांगितले, याप्रकरणाचा बहुतांशी तपास पूर्ण झाला आहे. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. विशालचे वकीलपत्र घेतल्याने आपणास, कुटुंबीयांना काही स्वयंघोषित जागल्यांकडून दररोज लक्ष्य केले जात आहे. यासंदर्भात आपण पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

हेही वाचा…लाचखोर सहाय्यक निबंधक आणि सहकारी अटकेत, गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी घेतली ६० हजारांची लाच

घराला नोटीस

विशाल गवळीचे घर धोकादायक असल्याचे पुढे आले आहे. त्यांना यापूर्वी पालिकेने नोटीस दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी काही दुरुस्त्या केल्या आहेत. त्याची माहिती पालिकेकडे आलेली नाही. ही माहिती नोटीस पाठवून पुन्हा मागविण्यात आली आहे. या दुरुस्तीच्या कागदपत्रांची छाननी करून विशाल गवळीच्या घरासंदर्भात प्रशासन योग्य निर्णय घेईल, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी माध्यमांना सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan court sent vishal gawli and sakshi to judicial custody till january 18 for murder sud 02