डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरातील लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या तीन बहिणींना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून जेजुरी येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे २३ तोळे सोने, रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेतील चित्तरंजन दास रस्त्यावर निळकंठ सोसायटीत राहणाऱ्या चैताली शेट्टी दरवाजा बंद करून सकाळी कामावर निघून गेल्या. पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी दिवसाढवळ्या त्यांच्या बंद दाराचे कुलूप तोडून घरातील दोन लाखाची रोख, २३ तोळे सोन्याचा ऐवज चोरून नेला. संध्याकाळी कामावरून परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. याप्रकरणी चैताली यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही चित्रण पथकाने ताब्यात घेतले. त्यामध्ये तीन महिला या चोरीत सहभागी असल्याचे दिसले. रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्हीमध्ये या महिला डोंबिवलीहून लोकलने घाटकोपर येथे गेल्याचे दिसले. या महिला मानखुर्द, कुर्ला भागातील रहिवासी असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली.
या महिलांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिस पथकासमोर होते. पोलिसांनी या तिन्ही महिलांची ओळख पटवून त्यांचे मोबाईल क्रमांक मिळविले. तांत्रिक माहितीच्या आधारे या तिन्ही महिलांच्या मोबाईलची ठिकाणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरी येथे आढळून येत होती. या महिला चोरी केल्यानंतर जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेल्याची माहिती मानखुर्द भागातून मिळाली.
वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जेजुरी भागात सापळा लावला. तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्या महिलांना अटक केली.
सारीका शंकर सकट, सुजाता शंकर सकट आणि मीना उमेश इंगळे अशी या महिलांची नावे आहेत. या तिघींच्या विरोधात यापूर्वी मुंबई, ठाण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी दिली. या महिलांनी आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत त्याची माहिती घेतली जात आहे, असे शिरसाठ यांनी सांगितले. या कारवाईत पोलीस निरीक्षक मोहन कळमकर, हवालदार विनोद चनने, अनुप कामत, गुरनाथ जरग सहभागी झाले होते.