कल्याण- गेल्या वर्षापासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी परिसरात रस्त्याने पायी चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा मंगळसूत्र, सोनसाखळी ऐवज हिसकावून पळून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या लुटीच्या घटनांमधील चार जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टिटवाळा जवळील बनेली गाव भागातून सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून सोने, चांदीचा एकूण पाच लाख १५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
हे चारही लुटारू आंबिवली मधील इराणी वस्तीमधील रहिवासी आहेत. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सलमान उर्फ राजकूप असदल्ला इराणी (२३), हसन अजिज सय्यद (२४), सावर रजा सय्यद इराणी (३५), मस्तान अली दुदान अली इराणी (४६) अशी आरोपींची नावे आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरातील पोलीस ठाणे हद्दीत दररोज एक ते दोन पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज दुचाकीवरुन आलेल्या भुरट्या चोरट्यांकडून लुटून नेल्याची घटना घडते. या घटनांच्या तक्रारी कल्याण परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली-कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
मंगळसूत्र लुटून नेत असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत असताना पोलीस करतात काय, असा या महिलांचा प्रश्न होता. या सर्व लुटीच्या घटनांचा स्थानिक पोलिसांबरोबर कल्याण गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांना गुप्त माहिती मिळाली की, ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात लुटमारीच्या घटना करणारे काही जण टिटवाळा जवळील बनेली गाव हद्दीत येणार आहेत. वरिष्ठ निरीक्षक शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, हवालदार संजय माळी, बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, प्रशांत वानखेडे, विलास कडू, प्रवीण बागूल, अनुप कामत, बापूराव जाधव, मेघा जाने, मंगला गावित, गोरखनाथ पोटे, अमोल बोरकर, उल्हास खंडारे, विश्वास माने, उमेश जाधव, विनोद चन्ने यांच्या पथकाने बनेली गाव हद्दीत सापळा लावला.
ठरल्या वेळेत दोनच्या गटाने चार जण बनेली हद्दीत घुटमळू लागले. ते एकमेकांना इशारे करत होते. सापळा लावून बसलेल्या पोलिसांना त्यांच्या हालाचली कळत होत्या. साध्या वेशातील एका हवालदाराने आरोपींमधील एकाला हटकले. त्याने उलटसुलट उत्तरे देऊन तेथून पळण्याचा प्रयत्न केला. हेच आरोपी असल्याची खात्री पटल्यावर पथकाने चारही जणांना घेरून अटक केली.
हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यात १८ बालविवाह रोखण्यात यश, सरकारी यंत्रणांची ३६ महिन्यांतील कामगिरी
आरोपींनी दिलेल्या माहितीमधून त्यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीत दोन, बाजारपेठ हद्द दोन, डोंबिवलीत टिळकनगर हद्दीत एक, ठाण्यात कापुरबावडी, राबोडी पोलीस ठाणे हद्दीत एक असे सहा सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहेत, अशी कबुली वरिष्ठ निरीक्षक शिरसाट यांना दिली. त्यांच्याकडून चोरीचा पाच लाख १५ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
या चोरट्यांच्या माहितीमधून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांना आहे.