कल्याण : ठाणे- कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात आणि या तिन्ही शहरांमध्ये नागरिकांचे, रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या कर्नाटक आणि तेलंगणातील दोन चोरट्यांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण पूर्वेतील रेल्वे यार्डातून अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा लाख ७९ हजाराचे महागडे ४२ मोबाईल जप्त केले आहेत. यामधील १९ मोबाईल हे शहरातील पादचाऱ्यांच्या हातामधून हिसकावलेले आहेत. चोरलेले मोबाईल ते परराज्यात जाऊन विक्री करणार होते, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी दिली. आतापर्यंत २३ गुन्ह्यांची कबुली चोरट्यांनी दिली आहे.

चिन्ना व्यंकटेश पुसला (३२, रा. हुबळी, धारवाड, जि. कर्नाटक), अशोक हनुमंत आवुला (२५, रा. तेलंगणा, सध्या राहणार दहिसर मोरी, शिळफाटा, ता. कल्याण) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. कल्याण, डोंबिवली आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रवाशांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेडकर, उपनिरीक्षक प्रकाश चौगुले आणि पथकाने वरिष्ठांच्या आदेशावरून मोबाईल चोरांचा शोध सुरू केला होता.

हा तपास सुरू असताना गु्न्हे शाखेच्या पथकाला दोन मोबाईल चोर कल्याण रेल्वे यार्डातून कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी येत आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने रेल्वे यार्डात धाव घेतली. त्यावेळी दोन इसम गप्पा मारत रेल्वे यार्डातून रेल्वे स्थानकाच्या दिशेने येताना आढळले. साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना हटकले. त्यावेळी ते उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी ते सराईत मोबाईल चोरटे असल्याचे निष्पन्न असल्याचे चौकशीत आढळले. त्यांनी ठाणे, कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानक भाग आणि शहरी भागात नागरिकांचे मोबाईल चोरले असल्याचे निष्पन्न झाले.

लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीचे मोबाईल ते परराज्यात विक्री करण्यासाठी नेणार होते. या चोरट्यांकडून सात लाखाचे ४२ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. हे मोबाईल ज्यांचे आहेत त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या आदेशावरून लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या चोरट्यांनी इतर शहरांमध्ये मोबाईल किंवा इतर चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader