कल्याण : कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली जवळील काटई बदलापूर रस्त्यावरील मानपाडा येथील मौर्या ढाब्याच्या बाजुला तीन जणांकडून व्हेल माशाची उलटी (ओकारी) शुक्रवारी जप्त केली. हे आरोपी पनवेल जवळील रहिवासी आहेत. या उलटीची बाजारातील किंमत सहा कोटी २२ लाख रूपये आहे.
अनिल राधाकृष्ण भोसले, अंकुश शंकर माळी, लक्ष्मण शंकर पाटील अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी पनवेल परिसरातील वावंजे-मोहोदर, कासव, न्यू पनवेल भागातील रहिवासी आहेत. आरोपींना कल्याण न्यायालयाने येत्या मंगळवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना पनवेल भागातील तीन जण डोंबिवली परिसरात व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी गुप्त माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काटई बदलापूर रस्ता भागात पोलिसांनी सापळा लावला. ठरल्या वेळेत तीन जण मानपाडा भागातील मौर्या ढाब्या जवळ एक मोटारीतून आले. पोलिसांनी या मोटीराला घेरले. मोटारीतील तीन जणांची चौकशी केली. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्या जवळील सफेद बंदिस्त पिशवीची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये व्हेल माशाची उलटी आढळून आली. ही उलटी पाच किलो साडेसहाशे ग्रॅम वजनाची होती. व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करून बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी वन्य जीव संरक्षण कायद्याने आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, दत्ताराम भोसले, हवालदार गुरूनाथ जरग, विश्वास भावे, विलास कडू, मिथुन राठोड, गोरक्ष रोकडे, महिला हवालदार सहभागी झाले होते. ही उलटी आरोपींनी कोणाला विक्री करण्यासाठी आणि कोठून आणली होती याचा तपास सुरू केला आहे.