Kalyan Crime News : कल्याण पश्चिम भागात अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता एक नवी घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व भागातील काटेमानवली या ठिकाणी आठ ते दहा जणांच्या टोळीने घरात घुसून मारहाण केली. रमाशंकर दुबे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने रमाशंकर दुबे घरात घुसून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी या घटनेबाबत काय म्हटलं आहे?
“कल्याणमधील काटेमानवलीत दुबे चाळ नावाच्या भागात रमाशंकर दुबे नावाचे ६० वर्षांचे गृहस्थ राहतात. त्यांचा आणि त्यांच्या चुलत भावाचा गावातील जमिनीवरुन वाद आहे. या वादातून २१ डिसेंबरच्या रात्री रमाशंकर दुबे यांना एका टोळीने लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या आणि कोयता घेऊन जात मारहाण केली. तसंच त्यांना शिवीगाळही करण्यात आली. ज्यानंतर कोळशेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ११८, १९३, १९०, १८९, ३९३ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातला जो प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव रणजीत दुबे आहे. तोदेखील जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. तर इतर आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत.” अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच लवकरात लवकर आऱोपींना पकडण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
हे पण वाचा- कल्याणमधील मारहाण प्रकरणातील आरोपी अखिलेश शुक्लासह इतर आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी
दोन दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम भागात काय घडलं?
सरकारी नोकरी करणारे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे योगीधाम सोसायटीत शेजारी राहतात. अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. धूप लावल्याने वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात हा धूर जातो, त्यांच्या घरात असलेल्या तीन वर्षांच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो. ही बाब वर्षा यांनी गीता यांना सांगितली. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. ज्याचा राग शुक्ला यांना आला आणि त्यांनी काही लोकांना बोलवून या दोघांना मारहाण ( Kalyan Crime ) केली. या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.