Sanjay Raut on Kalyan Ajmera Society Scuffle: कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मनसेनं मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला असताना दुसरीकडे आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजमेरा सोसायटीत अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने अभिजीत देशमुख यांना बेदम मारहाण केली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

“फक्त कल्याण नाही, मुंबईतही असे प्रकार”

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं. “कल्याणमध्येच नव्हे, तर मुंबईतही हे असे प्रकार घडले आहेत. मी वारंवार बोलतोय, कल्याणमध्ये मराठी माणसावर परप्रांतीयांनी काल हल्ले केले. मराठी माणसं घाणेरडे आहेत असं म्हटलं. शिव्या घातल्या. मुंबईतही मराठी बोलायचं नाही वगैरे म्हणत मराठी माणसाला जागा नाकाल्या जात आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

Kalyan Crime: कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!

“निवडणूक निकालांनंतर मराठी माणसांवर हल्ले”

“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना निर्माण केली. भाजपानं मराठी माणसाची संघटना फोडून मराठी माणूस कमजोर केला. इथे मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी, मराठी माणसाची लढण्याची ताकद नष्ट व्हावी यासाठी हे केलं. मुबई अदाणी, लोढा, गुंदेचा व्यापाऱ्यांच्या घश्यात घालावी यासाठी मोदी-शाहा व त्यांच्या व्यापारी गोतावळ्यानं मराठी माणसाला कमकुवत केलं आहे. निवडणूक निकालांनंतर मराठी माणसावर हल्ले वाढू लागले आहेत. मराठी माणसाला मुंबईतून घालवण्याचे उद्योग चालू आहेत”, असा दावा राऊतांनी केला.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी कल्याणमधील प्रकारावरून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना लक्ष्य केलं. “स्वत:ला जे शिवसेना समजतायत, मोदी-शाहांनी ज्यांच्या हातात शिवसेना चिन्ह दिलं, त्या नामर्द लोकांना कालची कल्याणमधील घटना टोचते आहे का? आम्ही बघू काय करायचं ते. मराठी माणसाबाबत ज्यांना वेदना आहे त्यांनी एकत्र यायला पाहिजे. एकनाथ शिंदे नामर्द आहेत. सत्तेसाठी लाचार आहेत. काल मराठी माणसावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. आपण महाराष्ट्राच्या मराठी माणसाचे प्रतिनिधी आहात ना? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोन उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही स्वत:ला कसले मराठी समजता?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

Story img Loader