Kalyan Society Scuffle Viral Video: कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना १० ते १२ टाके पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सोसायटीतील एकीकडे किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे या प्रकरणातील मराठी विरुद्ध अमराठी, प्रशासनाशी थेट संबंध असल्याचा गर्व अशा बाबीही आता चर्चेत आल्या आहेत. सोसायटी व परिसरातील रहिवाश्यांनी यासंदर्भात मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला आहे.
नेमकं काय घडलं कल्याणमध्ये?
योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडला. अखिलेश शुक्ला व विजय कळवीकट्टे हे सख्खे शेजारी. पण त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला. शुक्ला यांच्या पत्नी घराबाहेर लावत असलेल्या धूपच्या धुरामुळे कळवीकट्टे कुटुंबातील लहान मूल व वृद्ध व्यक्तीला त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार यासंदर्भात शुक्ला यांना सांगितलं जात होतं. मात्र, यावरून त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. शिवीगाळ, मारहाणीपर्यंत प्रकरण गेलं. त्याच मजल्यावर राहणारे अभिजीत देशमुख व धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा राग धरून शुक्ला यांनी अभिजीत देशमुख यांनाच मारहाण केली.
या प्रकरणात देशमुख व शुक्ला या दोघांच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे.
रहिवाश्यांनी मांडल्या तक्रारी!
दरम्यान, या प्रकरणावर सोसायटी व परिसरातील रहिवाश्यांनी शुक्ला यांच्याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. टीव्ही ९ नं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. “ते म्हणत होते तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहात. मटण-चिकन खातात. मराठी लोक झोपडपट्टीतून आले आहेत. तुम्ही भिकारडे लोक वगैरे बोलायला लागले. त्यांचा नवराही (शुक्ला) बोलायला लागला. मी दोन मिनिटांत तुम्हाला सरळ करतो. माझी ओळख आहे. तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला जा. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला तर सगळे जागेवर येतील एवढं तो बोलला. त्यानंतर त्याच्या हातात काहीतरी शस्त्र होतं. ते त्यांनी त्या मुलाच्या डोक्यात मारलं”, अशी माहिती एका रहिवाश्यानं दिली.
दरम्यान, शुक्ला गाडीवर लाल दिवा लावून फिरतात आणि सोसायटीत अरेरावी करतात, अशीही तक्रार एका महिला रहिवाश्याने केल्याचं टीव्ही ९ नं म्हटलं आहे. “तो गाडीवर लाल दिवा लावून फिरतो. सांगतो की मी मोठा अधिकारी आहे, मला कुणीही काहीही करणार नाही”, असं एका महिला रहिवाश्याने सांगितलं.
मनसेकडून शुक्ला यांच्या अटकेची मागणी
दरम्यान, या सर्व प्रकरणात मनसेनं उडी घेतली असून आपण मारहाण झालेल्या मराठी रहिवाश्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचं मनसेचे कल्याणमधील पदाधिकारी उल्हास भोईर यांनी सांगितलं. “वाद सोडवण्यासाठी देशमुख गेले होते. त्यांना इतकं मारलं आहे की त्यांची प्रकृती गंभीर आहे. देशमुख कुटुंबासह आम्ही म्हणजेच मनसे उभी आहे. जर २४ तासांत या प्रकरणी आरोपींना अटक केली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने त्याला इकडे आणून पोलिसांच्या स्वाधीन करणार”, असा इशाराच भोईर यांनी दिला आहे.