ठाणे : झालेला वाद हा शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो अशी प्रतिक्रिया अखिलेश शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्याच बरोबर या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी देखिल त्यांनी केली आहे.
कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल भागात आजमेरा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत बुधवारी रात्री घरात धूप अगरबत्ती लावण्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले. या प्रकरणी या सोसायटीतील रहिवासी असलेल्या मंंत्रालयातील एका अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून दहा जणांनी सोसायटीतील दोन मराठी कुटुंबियांना मारहाण केली. या मारहाण प्रकरणी संबंधित मंत्रालयीन अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक करावी. त्यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, अशी कलमे खडकपाडा पोलिसांनी लावावीत, या मागणीसाठी सोसायटीतील रहिवाशांनी गुरुवारी रात्री सोसायटी आवारात निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा : कल्याणमध्ये आजमेरा सोसायटीतील रहिवाशांची मंत्रालयीन अधिकाऱ्याच्या अटकेसाठी निदर्शने
मात्र या प्रकरणातील अखिलेश शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप केला. त्यांच्या पत्नीवर हल्ला झाला आणि नंतर त्यांच्या मराठी भाषिक मित्रांनी त्यांना वाचवले. आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. वाद झाला त्या दरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला. माझ्या पत्नीला केसांनी पकडून मारहाण केली. आपल्या जुन्या शेजारपणाच्या वादाला वेगळे वळण देण्याच्या प्रयत्न केला जात असल्याचे त्यांंनी प्रतिक्रियेत म्हटले आहे. या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी देखिल शुक्ला यांनी केली आहे.