कल्याण – शाळेतील एका विद्यार्थिनीविषयी समाजमाध्यमावर एक संदेश सामायिक केल्याची शिक्षा म्हणून कल्याणजवळील वरप गाव परिसरातील सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक आल्विन ॲन्थोंनी यांनी अनिश दळवी (१६) आणि त्याच्या दोन सहकारी मित्रांना त्यांच्या शाळेतील दालनात पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप मयत मुलाच्या कुटुंबीयांंनी टिटवाळा पोलीस ठाण्यातील तक्रारीत केला आहे. या सगळ्या प्रकाराने तणावात असलेल्या अनिशने गुरुवारी घरी आल्यानंतर घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. या सगळ्या प्रकाराने पालकांनी शाळा चालकांंविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मारहाणीनंंतर संचालक आल्विन ॲन्थोनी यांनी अकरावी इयत्तेत शिकत असलेल्या अनिश दळवी, वेदांत जनार्दन मोहपे, हर्षवर्धन राम पाटील या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली. तुम्हाला शाळेतून काढून टाकले आहे. तुम्ही परत शाळेत यायचे नाही. तुम्ही मेले तरी शाळेत घेणार नाही, अशी धमकी संचालक ॲन्थोनी यांनी या विद्यार्थ्यांना दिली. या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या अनिशला घरी आई, वडिलांना काय सांगायचे असा प्रश्न त्याच्या समोर निर्माण झाला. संचालकाने अनिशला घरी सोडतो म्हणून ते स्वताच्या वाहनाने घेऊन गेले. घरी आल्यानंतर अनिश तणावाखाली होता.
हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेकायदा मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई
या तणावामध्ये घरात काहीही न सांगता अनिशने राहत्या घरात गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिश अद्याप गच्चीवरून खाली येत नाही म्हणून त्याच्या भावाने खात्री केली तो गळफास घेतलेल्या अवस्थते होता. हा प्रकार पाहून भाऊ घाबरला. वडील अनिल यांनी तातडीने अनिशच्या शिक्षिका वर्षा यांना संपर्क केला. शाळेत काय घडले या विषयी माहिती घेतली. त्यावेळी वर्षा यांनी अनिशला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे, असे वडील अनिल यांना सांगितले.
हेही वाचा – कल्याण पूर्वेत बगीचा आरक्षणावरील शिवसेनेचे लोकसभा निवडणूक कार्यालय थाटात उभे
याप्रकरणी अनिशचे वडील अनिल दळवी यांंनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून या आत्महत्येला जबाबदार धरत सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक ॲन्थोनी यांना गुरुवारी रात्री अटक केली. अनिश टिटवाळाजवळील निंबवली गावचा रहिवासी आहे. तो कुटुंबीयांसमवेत राहत होता. तो अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. टिटवाळा परिसरात संचालक ॲन्थोनी यांच्या कृत्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले या प्रकरणाचा तपास करत आहेत.