कल्याण : नागरीकांच्या सोयीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेने मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांमधील सर्व नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्टीच्या दिवशीही नागरिकांना मालत्ता कर, पाणी देयक भरणा करता यावा या उद्देशाने प्रशासनाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संगणक विभागाच्या उपायुक्तांनी ही माहिती १० प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना कळविली आहे. अभय योजना आणि मालमत्ता कराची चालू वर्षाची रक्कम ३१ जुलैच्या आत करदात्या नागरिकांनी भरणा केली तर त्यांना पाच टक्के परतावा (रिबेट) मिळतो.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी रहिवासी नोकरदार, व्यावसायिक आहे. अनेकांना कार्यालयीन कामामुळे पालिकेत येऊन मालमत्ता, पाणी देयक भरणा करता येत नाही. अशा नागरिकांना सुट्टीच्या दिवशी पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात येऊन कर भरणा करता यावा यासाठी प्रशासनाने सुट्टीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्र सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी साडे पाच वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक नागरीकांनी या सुविधेचा, वेळेत कर भरणा करुन परतावा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.