कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत दररोज ६०० टन कचरा तयार होतो. गेल्या ४० वर्षांपासून हा कचरा आधारवाडी क्षेपणभूमीत टाकण्यात येतो. मात्र, दहा वर्षांपूर्वीच या क्षेपणभूमीची क्षमता संपल्याने ती बंद करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला कळवले आहे.
आधारवाडीला पर्याय म्हणून १५ वर्षांपूर्वी महापालिकेने उंबर्डे येथे कचरा टाकण्यासाठी ३० एकर जमीन घेतली. तेथील भूमिपूत्रांना सर्व मोबदले देण्यात आले. काहींना या जमिनीचे विकास हस्तांतरण हक्कही मिळाले आहेत. मात्र, यातीलच काही भूमिपूत्र आणि विकासक येथे गृहप्रकल्प उभारत आहेत. क्षेपणभूमी झाल्यास या गृहप्रकल्पांना फटका बसेल, या भीतीने उंबर्डे क्षेपणभूमीला विरोध करण्यात येत आहे. महापालिकेने शास्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा ६० कोटींचा एक प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. या प्रकल्पास हिरवा कंदील दाखविल्यानंतर कल्याण, डोंबिवलीतील क्षेपणभूमी अस्तित्वात येऊ शकेल. मात्र, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे. ती सध्यातरी कल्याण-डोंबिवलीतील राजकारण्यांमध्ये दिसत नाही.
मॉल्स, हॉटेल्सच्या कचऱ्यातून बायोगॅस
ठाणे, कळवा व मुंब्रा या शहरांमधून हॉटेल्स आणि मॉलमधून दररोज १०० मेट्रिक टनापेक्षा अधिक प्रमाणात कचरा निर्माण होत असतो. काही वर्षांपूर्वी महापालिकेने महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ हाउसिंग इंडस्ट्रीज या विकासकांच्या संस्थेच्या माध्यमातून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे बायो मिथेनायझेशन प्रकल्प उभा केला. या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस तयार करण्याचे काम सुरू केले. ठाणे शहरातील उपाहारगृहे तसेच मॉल्समधून निघणारा कचरा या ठिकाणी आणून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला जातो.
जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट
ठाणे महापालिकेने एन्व्हायरो व्हिजिल या संस्थेच्या माध्यमातून जैव वैद्यकीय कचऱ्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील वेगवेगळी शासकीय रुग्णालये, दवाखान्यांमधून दररोज सुमारे तीन लाख ५२ हजार किलो इतका वैद्यकीय कचरा निघतो. या जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया आणि या कचऱ्याचा निचरा करण्यासाठी एक भट्टी तयार करण्यात आली आहे. या भट्टीत प्रतितास ५० किलोग्रॅम कचऱ्याचा निचरा करण्याची व्यवस्था उभी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून जैव वैद्यकीय कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी सहभागी होणाऱ्या संस्थांच्या संख्येत वाढ झाली आहे.