महिलांना महापौरपदे भूषविण्यास दिली म्हणून शिवसेनेने नेहमीच खांदे उडवले. या महापौरपदांच्या कार्यकाळात किती विलक्षण तोडीची विकासकामे झाली, ते कधी शिवसेनेच्या मुंबई, ठाण्यातील नेत्यांनी उघड केले नाही. कल्याण-डोंबिवलीला लाभलेल्या बहुतेक महिला महापौरांनी शहर विकास केला की स्वविकास साधला, हे त्यांच्या कार्यकालाकडे पाहिले तर लक्षात येईल.
महापौरपदासाठी राखीव आरक्षण पडले, त्या आरक्षणासाठी शिवसेनेच्या मंगल शिंदे या एकमेव नगरसेविका पात्र होत्या. महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. शिक्षण, व्यवहार आणि शहर विकासाचे कसलेली ज्ञान नसलेल्या शिंदे यांनी महापौरपदाचा कारभार चालविण्यास सुरुवात केली. नावाला महापौरपदाच्या खुर्चीवर बसलेल्या. त्यांना व त्यांच्या पतीला काही दलाल, विकासक, पदाधिकारी सांगतील, त्याप्रमाणे त्या कार्यभार सांभाळत होत्या. रबर स्टॅम्पप्रमाणे अडीच वर्षांचा काळ पालिकेत सुरू होता. प्रत्येकाने आपली पोळी भाजून घेण्यासाठी, कामे वाजून घेण्यासाठी महापौर शिंदे यांच्या सहीचा वापर करून घेतला. सर्वसाधारण सभेत काय बोलायचे हेही महापौर शिंदेबाईंना लिहून देण्यात येत असे. यावरून पालिकेचा कारभार किती गतिमान, बुद्धिचातुर्याने चालत असेल, हे लक्षात येते. शिंदेबाईंच्या अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात विकासकामांऐवजी छपाईकामांना अधिक महत्व आले होते.
शहराला सुशिक्षित सुजाण महापौर मिळाला तर, सक्षमपणे शहराचा गाडा पुढे जाईल, असे प्रत्येक नागरिकाला वाटत होते. नागरिकांची ही अपेक्षा पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाली. बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतलेल्या वैजयंती घोलप-गुजर शहराच्या महापौर झाल्या. बोलायला फाडफाड, संभाषणचातुर्य, १५ वर्षांत अनेक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असल्याने बाईसाहेबांना प्रशासनाच्या खाचाखोचा माहिती होत्या. म्हणजे बाईंकडून तडाखेबाज कारभार होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. बाईंनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या घोषणा या अपेक्षा वाढवणाऱ्या होत्या. त्यातच महापौरबाईंचे बंधू पालिकेत आयुक्त म्हणून आले होते. नात्यातील हे बंध शासन-प्रशासनातील समन्वय वाढवून कामांना गती देईल, अशी आशा होती. पण सुरुवातीचा काही काळ सोडला तर गुजरबाईंच्या काळात शहराचा विकास फारसा झालाच नाही. उलट, मुरबाड रस्त्यावरील संथोम ट्रस्टला तेथील समाजमंदिर चालवायला देणे वगैरे निर्णय बाईंच्या अंगलट येऊ लागले. बेकायदा बांधकामे शहरात वाढू लागली होती. या विषयावर सभागृहात चर्चा घडावी म्हणून सत्ताधारी शिवसेना-भाजपचे नगरसेवक वगळून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रही होते. या मागण्या फेटाळून लावण्यात गुजरबाई आक्रमक होत्या. या गुजर यांच्या अडीच वर्षांच्या काळात १९ तहकुबी, लक्ष्यवेधी सूचना सर्वसाधारण सभेत दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १४ तहकुबी, लक्ष्यवेधी सूचना या अनधिकृत बांधकामांच्या होत्या. हे माहिती अधिकारात उघड झाले आहे. गुजर यांच्याकडून शहर विकासाच्या लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण, त्यांनी शिवाजी चौकातील शिवरायांच्या अर्ध पुतळ्याचे तोंड दक्षिणेला करणे आणि दुर्गाडी चौकात शिवरायांचा अश्वारूढ पूर्णकृती पुतळा उभा करणे एवढीच भव्यदिव्य कामे केली.
गुजर यांच्यानंतर कल्याणी पाटील यांच्या शिरावर महापौरपदाचा मुकुट आला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात कल्याणी पाटील यांचे अख्खे कुटुंब पालिकेच्या सेवेत आहे. जो महापौरांची मर्जी सांभाळेल, त्या अधिकारी, कर्मचाऱ्याने वाटेल ते त्याच्या हिताचे काम करावे असा एक अलिखित, अघोषित पायंडा पालिकेत पडला आहे. शहरातील सीमेंट रस्त्यांचा पसारा पडला आहे. बेकायदा बांधकामांनी शहर गिळायचे धरले आहे. विकासकामे पुढे नेण्यासाठी निविदा काढल्या जातात. त्या घेण्यासाठी ठेकेदार पुढे येत नाहीत. सगळे प्रकल्प ठप्प पडले आहेत. ते मार्गी लावावेत, या महत्त्वाच्या सभागृहात चर्चा घडवून आणावी म्हणून कल्याणी पाटील यांना कधी वाटले नाही. फक्त आयुक्त, अधिकाऱ्यांची पाठराखण करून पुन्हा महापौरपदाची वरमाला घालण्यासाठी महापौरांसह त्यांचे अख्खे कुटुंब लालदिवा पुन्हा घरात यावा यासाठी गुढी उभारण्यात गुंतले आहे. महापौर क्रीडा स्पर्धावर गेल्या पाच वर्षांत पावणे दोन कोटीचा चुराडा केला आहे. पालिकेच्या तिजोरीची महापौर कल्याणी पाटील यांनी क्रीडा अधिकारी राजेश भगत यांना हाताशी धरून उधळपट्टी केली आहे.