बापगाव येथे महावितरणचे विद्युत उपकेंद्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण, डोंबिवली या शहरांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी महावितरण कंपनीने बापगाव येथे विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाड या संकटांतून कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. तसेच हे उपकेंद्र सुरू झाल्यानंतर शहरातील नागरिकांची उन्हाळय़ातील भारनियमनातूनही सुटका होण्याची चिन्हे आहेत.

[jwplayer CdTbNsE8]

कल्याण-डोंबिवली शहरांतील ग्राहक वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे हैराण आहेत. उन्हाळ्यात महावितरणच्या वतीने वीजबचतीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. त्यानंतर पावसाळ्यात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडतात. त्यातच ग्राहकांचा वीजवापर कमी असूनही त्यांना भरमसाट वीज बिले आकारली जातात. यांसारख्या अनेक समस्यांनी ग्राहक हैराण आहेत. या दोन्ही शहरांतील लोकसंख्येच्या तुलनेत सध्या असलेली सात उपकेंद्रे अपुरी पडू लागली आहेत. यावर उपाय म्हणून नव्याने उपकेंद्र उभारणीचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

नव्या आराखडय़ानुसार दिवा-वसई रोडवरील बापगाव येथे हे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. २२ बाय २२ केव्ही क्षमतेच्या या उपकेंद्रामुळे कल्याण-डोंबिवली शहरांतील वीजपुरवठा सुरळीत होणार आहे. यासाठी ५४.५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कामास सुरुवात झाली असून २२ केव्हीच्या एसटी केबल वायर टाकण्यात आल्या आहेत.

केवळ २०० मीटर लांबीचे काम शिल्लक असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. बापगाव येथील उपकेंद्र झाल्यावर याचा जास्तीत जास्त फायदा कल्याण पश्चिम भागाला होणार आहे.

शिवाय डोंबिवली शहराला वीजपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी व प्रीमिअर येथील उपकेंद्रांनाही या केंद्रावरून वीज दिली जाणार आहे. यामुळे डोंबिवली शहरातील तक्रारी कमी होतील.

वीजपुरवठय़ाची सद्य:स्थिती

* सद्य:स्थितीत कल्याण पश्चिमेला पाच, कोनगाव येथे एक व डोंबिवलीमध्ये एक अशी एकूण सात उपकेंद्रे आहेत.

* कल्याण पूर्व, पश्चिमेतील खंबाळपाडा परिसर तसेच डोंबिवली पश्चिम व पूर्वेतील काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत.

* कल्याण पश्चिमेतील पाच उपकेंद्रांवर  लोकसंख्येचा भार वाढला असून त्यामुळे सर्व भागात वीजपुरवठा सुरळीत होत नाही.

छोटी वीजकेंद्रे वाढवणार

कल्याण, डोंबिवलीत वीजपुरवठय़ाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी या ठिकाणी छोटी वीजकेंद्रे उभारण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. डोंबिवली पश्चिमेला व निळजे गाव येथे ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मात्र कल्याण पूर्वेतील गोरीपाडा सबस्टेशनजवळील जमीन देण्यास तेथील स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागेल, असेही ते म्हणाले.

[jwplayer PuSvtqP8]