कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती हाकेच्या अंतरावर असतानाही किरकोळ बाजारात असलेल्या भाज्यांच्या महागाईवर ‘लोकसत्ता ठाणे’ने आवाज उठवताच कल्याण एपीएमसीतील अनेक व्यापारी डोंबिवलीकरांच्या मदतीला धावले आहेत. डोंबिवलीकरांनी किरकोळ बाजारातून अवाच्या सवा दराने भाजी खरेदी करण्याऐवजी एपीएमसीमधील भाजी मंडईतून घाऊक आणि स्वस्त दरातील भाजी खरेदी करावी, असे आवाहन बाजार व्यवस्थापनाने केले आहे.
डोंबिवली शहरापासून काही अंतरावर असलेल्या कल्याण शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाज्या येतात. मात्र, डोंबिवलीतील किरकोळ बाजारात भाज्यांचे दर सातत्याने चढे राहत आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मधून गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध झाले होते. त्याची कल्याण बाजार समिती प्रशासनाने तातडीने दखल घेतली. कल्याण एपीएमसीतील भाज्यांचे घाऊक दर अतिशय कमी असताना किरकोळ बाजारातील त्यांची चढय़ा दराने विक्री करणे योग्य नाही, असे बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना सांगितले. तसेच ग्राहकांनी शहरातील किरकोळ बाजारात जाण्यापेक्षा कल्याण एपीएमसीमधून भाजी खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
किरकोळ विक्रेत्यांनीही कल्याण एपीएमसीमधून स्वस्त आणि माफत दरात विकली जाणारी भाजी खरेदी , असेही चौधरी म्हणाले.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा