कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या क्रीडा विभागात कार्यरत असताना अनियमितता केल्याचे आरोप असलेले क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत यांची आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अग्निशमन विभागात तडकाफडकी बदली आहे. मागील आठ वर्षापासून भगत क्रीडा विभागात कार्यरत होते. भगत यांची मूळ नियुक्ती अग्निशमन प्रेरक (लीडिंग फायरमन) आहे. मागील काही वर्षात महापौर, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने क्रीडा विभागात बस्तान बसविण्यात भगत यशस्वी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्रीडा विभागात कार्यरत असताना त्यांनी या विभागात अनेक गैरप्रकार, अनियमितता केल्याच्या तक्रारी माहिती कार्यकर्ते मनोज कुलकर्णी पालिका, शासनाकडे केल्या होत्या. याप्रकरणाची पालिका स्तरावरुन चौकशी सुरू होती. अनेक महासभेत हा विषय चर्चेला आला होता. वेळोवेळी चौकशांची आश्वासने देऊन हा विषय राजकीय दबावामुळे गुंडाळण्यात येत होता. भगत यांना अभय मिळत असल्याने ते क्रीडा विभागात कार्यरत होते. २०१५ पासून भगत क्रीडा विभागात होते.

हेही वाचा >>> कल्याण रेल्वे स्थानकात बालकाचे अपहरण करणाऱ्या नाशिकच्या इसमाला अटक

काही वर्षापासून रेंगाळलेला हा विषय आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यापूर्वी भगत यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. भगत यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यांचे उत्तर समाधानकारक न वाटल्याने आयुक्त दांगडे यांनी भगत यांची क्रीडा विभागातून त्यांच्या मूळ नियुक्तीच्या अग्निशमन विभागात बदली केली आहे.

दोषारोप

पालिकेतर्फे २०१५ ते २०१७ कालावधीत ग्रीको रोमन स्पर्धा सावळाराम महाराज क्रीडासंकुलात घेतली होती. या स्पर्धेसाठी स्थायी समितीची परवानगी घेण्यात आली नाही. आयुक्तांची या स्पर्धेला मंजुरी नव्हती. स्पर्धेसाठी वस्तू पुरवठादारांना कोणतेही कार्यादेश देण्यात आले नव्हते. या स्पर्धेची मूळ नस्ती दोन वर्ष भगत यांनी नियमबाह्य स्वताकडे ठेवली होती. ही स्पर्धा चार दिवसाची असताना ती दोन दिवस घेण्यात आली. देयके मात्र चार दिवसाच्या स्पर्धेची काढण्यात आली. स्पर्धेतील खेळाडू, पंच, व्यवस्थापक, स्वयंसेवक याची माहिती नस्तीमध्ये ठेवण्यात आली नाही. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाने भगत यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. या स्पर्धेसाठी २३ लाख ३८ हजार ३०० रुपये खर्च दाखविण्यात आला होता. याप्रकरणात सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजेंद्र मुकणे, उपायुक्त क्रीडा, तक्रारदार मनोज कुलकर्णी यांची साक्ष महत्वाची ठरली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali muncipal corportion sports supervisor rajesh bhagat ysh
Show comments