कल्याण : मालमत्ता कर वसुलीचा ५०० कोटीचा लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी मालमत्ता कर विभागाने मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याच्या, अशा मालमत्तांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांकडे थकित असलेल्या मालमत्ता कराच्या एकूण ५३ लाख ९५ हजार ८१३ रूपयांच्या थकबाकी रकमप्रकरणी एकूण २८ व्यापारी गाळे, सदनिका सील करण्याची कारवाई केली.
आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या उपस्थितीत या मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली. आंबिवली येथे एका राष्ट्रीयकृत बँकेने पालिकेची मालमत्ता कराची ३७ लाखाची रक्कम भरणा केली नव्हती. अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या उपस्थितीत या बँकेचे एटीम सील करण्याची कारवाई केली. या बँकेचे व्यवस्थापक यांचे दालन सील करण्यात येणार होते. पण त्यात आवश्यक कागदपत्रे असल्याने ती कारवाई स्थगित करण्यात आली.
डोंबिवलीत फ प्रभागात मंगलमूर्ती सफायर या सोसायटीतील ४० गाळेधारकांनी मालमत्ता कर भरणा केला नव्हता. हे गाळे सील करण्याची कारवाई साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सुरू करताच २५ गाळेधारकांनी तात्काळ पालिकेत ऑनलाईन कर भरणा केला. उर्वरित थकबाकीदारांनी तातडीने कर भरणा करण्याचे आश्वासन दिल्याने या गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली नाही.
ग प्रभागात साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी आयरे येथील गजानन कृपा चाळ एक लाख सहा हजार रूपयांच्या कर थकीतप्रकरणी, साई सहारा चाळीतील दोन गाळेधारकांनी एक लाख २६ हजाराची रक्कम तिजोरीत भरणा केली नव्हती. या दोन्ही मालमत्ता सील करण्यात आल्या.
ड प्रभागात साहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी दोन लाख १९ हजाराच्या थकबाकीपोटी युनियन बँकेचे एटीएम सील करण्याची कारवाई केली. अ प्रभागात साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दोन लाख ९० हजाराच्या थकबाकीपोटी १० सदनिका, चार दुकाने सील केली. जे प्रभागात साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी काटेमानिवली, तिसगाव भागातील मालमत्ता कराच्या ११ लाख ४५ हजाराच्या थकबाकीपोटी मालमत्ता सील, पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली. तिसगाव, नेतिवली येथे कारवाई करत असताना थकबाकीदाराने सात लाख ४६ हजाराची रक्कम घटनास्थळीच भरणा केली. कोळसेवाडी येथे कारवाईच्यावेळी एक लाख ३३ हजार रूपयांचा कर भरणा थकबाकीदाराने तात्काळ केला. त्यामुळे या दोन्ही कारवाया थांबविण्यात आल्या.
आय प्रभागात साहाय्यक आयुक्त भारत पवार यांंनी कर वसुली मोहिमेसाठी मालमत्ता सील, पाणी पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.