कल्याण : मागील महिनाभरापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झालेल्या दहा इलेक्ट्रिक बस – विद्युत बस पूर्ण क्षमतेचे चार्जिंंग स्टेशन ( विद्युत भारीत केंद्र) आणि त्याला विद्युत भार पोहचविणारे रोहित्र बसविण्याचे बाकी असल्याने उभ्या आहेत.

शहरातील प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार करून केंद्र शासनाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना इंधनावर धावणाऱ्या बसची संख्या हळूहळू कमी करून विद्युत यंत्रणेवर धावणाऱ्या बस सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या बससाठी केंद्र शासनाने महापालिकांना निधी उपलब्ध करून दिला आहे. कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात येत्या काळात सुमारे २५० विद्युत बसचा ताफा टप्प्याने दाखल होणार आहे. या ताफ्यातील पहिल्या टप्प्यातील १० बस कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा… पाळीव श्वानाच्या फिरण्यावरून डोंबिवलीतील लोढा हेवनमध्ये हाणामारी

या बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर प्रवासी वाहतुकीला सुरूवात होईल असे प्रवाशांना वाटले होते. या बसमधून प्रवास करताना मिळणारा आनंद, या बस रस्त्यावरून धावल्याने खरच शहरातील प्रदूषण कमी होईल का, अशी उत्सुकता नागरिक, पर्यावरणप्रेमींना आहे. गेल्या महिन्यापासून केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या बस गांधारे-बारावे येथील मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रस्ता भागातील मोहन अल्टिझा इमारती समोरील भागात उभ्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, या बस भारीत करण्यासाठी लागणारे भारीत केंद्र आणि त्याला लागणारे रोहित्र उपलब्ध नसल्याने या बस उभ्या आहेत. या बस ताफ्यात दाखल करण्यापूर्वीच विद्युत भारीत केंद्रे का सुरू करण्यात आली नाहीत, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.

दरम्यान, पालिका हद्दीत चार विद्युत भारीत केंद्रे पालिकेकडून सुरू केली जाणार आहेत. यासाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. खंबाळपाडा बस आगार, गणेशघाट आगार, शहाड उड्डाण पूल येथेही केंद्रे असणार आहेत. केडीएमटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्या की त्या बसचे नवीन भाग काढून त्याला जुने सुटे भाग जोडण्याची यापूर्वीची उपक्रमात पध्दत आहे. अशा पध्दतीने मागील २० वर्षात उपक्रमातील नवीन बसची वाट लावण्यात आली आहे. त्यामुळे या विद्युत बसची अशाप्रकारे वाट लागणार नाही याची काळजी घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत ठाकुरवाडीमध्ये शाळेच्या आरक्षणावर ‘महारेरा’ नोंदणीची बेकायदा इमारत

केडीएमटीने मध्यम आकाराच्या बस शहरातून प्रवासी वाहतुकीसाठी सुरू कराव्यात. मोठ्या लांबीच्या बस अलिकडे वाहतुकीला आणि वळणावर अडथळा करत असल्याच्या वाहन चालकांच्या तक्रारी वाढत आहेत.

विद्युत बसच्या भारीत केंद्रासाठी लागणारे रोहित्र बसविले की भारीत केंद्र पूर्णक्षमतेने सुरू होईल. विद्युत बस प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होतील. – डॉ. दीपक सावंत, परिवहन व्यवस्थापक, केडीएमटी.

Story img Loader