कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर मोकळा करणार; पालिका आयुक्तांचा निर्धार
कल्याण आणि डोंबिवली या रेल्वेस्थानकांच्या परिसरातील फेरीवाल्यांमुळे होणारी प्रवाशांची कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने जोमाने पावले उचलली असून, शनिवारी सकाळपासून पालिकेच्या पथकाने बुलडोझरच्या साह्याने परिसरातील बेकायदा टपऱ्या पाडण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिनाभरात कल्याण-डोंबिवली या दोन्ही स्थानकांचा परिसर फेरीवाला मुक्त केला जाईल, असा निर्धार महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना नव्या वर्षांत स्थानकातून ये-जा करणे सहजसोपे होण्याची चिन्हे आहेत.
कल्याण-डोंबिवली स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर पालिकेने गेल्या काही दिवसांपासून कारवाई चालवली आहे. पालिकेचे पथक कारवाई करते आणि त्यांची पाठ फिरताच फेरीवाले पुन्हा जागा बळकावतात, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र, यावेळी पालिकेने फेरीवाल्यांना पुन्हा डोके वर काढण्याची संधीच दिलेली नाही. शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत पश्चिम रेल्वेस्थानक भागातील पदपथावर थाटण्यात आलेल्या टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या टपऱ्या पुन्हा रेल्वे स्थानक भागात दिसू नयेत यासाठी जेसीबीच्या साहाय्याने जागीच उद्ध्वस्त करण्यात आल्या. शिवाजी चौक ते दुर्गाडी रस्त्यावरील लालचौकी भागात रस्त्यावर उभारण्यात आलेल्या टपऱ्या वाहतुकीला अडथळा ठरत होत्या.
‘रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त करण्यास आमचे प्रथम प्राधान्य असेल,’ असे आयुक्त रवींद्रन यांनी सोमवारी सांगितले. ‘स्मार्ट सिटी’साठी नागरिकांनी शहरातील वाहतूक समस्या, आणि रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्याबाबत सर्वाधिक अभिप्राय नोंदविले आहेत. या समस्यांच्या मुळाशी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले असून, यासंबंधीच्या शेकडो तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे यासंबंधीची कारवाई युद्धपातळीवर चालवण्यात येईल. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
डोंबिवलीतही कारवाई
डोंबिवली पूर्व भागाचे नियंत्रक असलेल्या महापालिकेच्या ग आणि फ प्रभागांनी फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. टेम्पोभर माल जप्त करून पालिकेच्या कोठडीत ठेवण्यात येत आहे. फ प्रभागाचे पथकप्रमुख संजय कुमावत, ग प्रभागाचे पथकप्रमुख संजय साबळे यांनी ही कारवाई सुरू केली आहे. वाहतूक विभागाने बेकायदा रिक्षा वाहनतळांवर कारवाई सुरू केली आहे, तर पालिकेने फेरीवाल्यांना हटविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पूर्व भागातील रस्ते मोकळे झाल्याचे दृश्य दिसत आहे.
२५० किमी रस्त्यांचे जाळे
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी एकूण अडीचशे किमी लांबीचे रस्ते तयार करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून त्याकरिता आर्थिक उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पे अॅण्ड पार्क धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बांधकाम बंदीला आव्हान देणार
घनकचऱ्याबाबत निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी पालिकेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी केली आहे. येत्या महिन्याभरात बांधकाम बंदीवरील आदेश उठण्याची शक्यता आहे, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी कल्याण पूर्व, टिटवाळा आणि २७ गावे या भागात विकासकामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महिनाभरात फेरीवाला मुक्ती!
‘रेल्वे स्थानक परिसर अतिक्रमण मुक्त करण्यास प्रथम प्राधान्य असेल,’ असे आयुक्त रवींद्रन यांनी सांगितले.
Written by झियाऊद्दीन सय्यद
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-12-2015 at 03:19 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali railway station area now free from hawkers in one month