Rain News Update: मंगळवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ठिबकणाऱ्या अवकाळी पावसाने साडे सहा वाजता कल्याण-डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. सकाळीच कामावर निघणाऱ्या नोकरदार, वृत्तपत्र विक्रेते ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडवली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहाटेपासून उघड्यावर भाजीपाला ठेऊन विक्री व्यवहार करणारे विक्रेते, खरेदीदार, वाहन चालकांची अवकाळी पावसाने भंबेरी उडवली. उघड्यावर ठेवलेला भाजीपाला, फळे, फुलं झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांना धावपळ करावी लागली. बाजारपेठांमध्ये सकाळचे व्यवहार होत असलेल्या ठिकाणी चहा, नाष्टा मंचकावर ठेऊन नियमित व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना इमारती, निवाऱ्याचा आडोसा घ्यावा लागला. वृत्तपत्र विक्रेत्यांना काही वेळ इमारतींचा आडोसा घेऊन वर्तमानपत्र भिजू नये म्हणून काळजी घ्यावी लागली.
मंगळवारी पहाटे साडे पाच वाजल्यापासून विजांचा लपंडाव सुरू होता. त्यानंतर काही वेळाने सोसाट्याचा वारा सुरू झाला. पावसाची रिमझिम सुरू झाली. एक तासानंतर साडे सहा वाजता जोरदार वाऱ्यांसह पावसाने दमदार हजेरी लावली. नोकरदारांची रेल्वे स्थानक, बस स्थानकात जाण्याची गडबड, मुलांची शाळेत जाण्याची धावपळ अशा वेळेत पावसाने हजेरी लावल्याने घरातील छत्री, रेनकोट बाहेर काढण्याची वेळ रहिवाशांवर आली.
पाऊस तात्काळ थांबण्याची चिन्हे नसल्याने नागरिक छत्री, विद्यार्थी रेनकोट घालून रस्त्याने ये-जा करताना दिसत होते. शाळेच्या बस थांब्यांवर पालक छत्रीचा आडोसा घेऊन उभे असल्याचे दिसत होते.
अवकाळी पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता. पहाटेच्या वेळेत वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या कोकिळेचे कुजन पावसामुळे थांबले होते. पक्ष्यांचा किलबिलाट काही वेळ थांबला होता. सकाळी सात वाजता पावसाचा जोर ओसरला. नियमितचे व्यवहार विनाछत्री सुरू झाले. सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान पावसाने काही वेळ हजेरी लावली होती. अवकाळी पावसाने रब्बी पिके घेणारा शेतकरी हैराण आहे.